दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील पीक नुकसानेचे पंचनामे युद्धपातळीवर

जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे प्रत्यक्ष पाहणीसह पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; शासनास नुकसानीचा दावा लवकरच सादर करणार

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा: खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट व शासनाने निर्धारित केलेल्या अन्य निकषांच्या आधारे भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी व लाखांदूर या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. दुष्काळामुळे झालेली पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या नुकसानेची वस्तुनिष्ठ नोंद होऊन त्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित यंत्रणाना पीक नुकसानेचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून नुकसानेचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्हाधिकारी सावन कुमार तसेच अपर जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार आणि अन्य अधिकारी प्रत्यक्ष शेतांवर भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत. नुकसानग्रस्त पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून शासनाच्या विहित निकषांनुसार पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्याची कार्यवाही कोणत्याही प्रकारे प्रलंबित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून पीक नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार असून, त्याआधारे शासनाकडे नुकसानीचा दावा सादर केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *