नूपुर नृत्य निकेतनचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज भंडाऱ्यात
भंडारा :- शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘नूपुर नृत्य निकेतन’ या संस्थेच्या भंडारा शाखेचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उद्या रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मोठ्या उत्साहात रंगणार आहे. हा सांस्कृतिक सोहळा पोलीस मुख्यालय सांस्कृतिक सभागृह, भंडारा येथे संपन्न होणार आहे.
नूपुर नृत्य निकेतन संस्था 2002 पासून शास्त्रीय नृत्य क्षेत्रात कार्यरत असून, 2015 मध्ये संस्थेची भंडारा शाखा सुरू झाली होती. नागपूर, भंडारा, उमरेड आणि वणी येथे विस्तारलेली ही संस्था दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करते.
या दिमाखदार कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सावन कुमार उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय लेखक व यशवंत एज्युकेशन ट्रस्टचे संचालक चेतन वानखेडे आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स, भंडारा च्या प्राचार्या सौ. वंदना आशिष आंबोलकर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
या सोहळ्यात संस्थेचे विद्यार्थी विविध शास्त्रीय भरतनाट्यम रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. भंडाऱ्यातील कलाप्रेमी, पालक आणि नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








