५९ कंत्राटी सफाई कामगारांच्या हकालपट्टी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा: भंडारा नगर परिषदेत गेल्या १० ते १५ वर्षापासून घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम करणाऱ्या ५९ कंत्राटी सफाई कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ २ ऑक्टोबर २०२६ महात्मा गांधी जयंती दिनापासून स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन, शाखा नगर परिषद भंडारा यांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

भंडारा नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून घनकचरा संकलन, स्वच्छता व संबंधित कामे करणारे ५९ कंत्राटी कामगार अत्यावश्यक व कायमस्वरूपी काम सातत्याने करीत आहेत. या कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन, वेतनाची नियमित व पारदर्शक अदायगी, सामायिक सुट्टी, ओव्हर टाईम, सुरक्षा साधने, सामाजिक सुरक्षा व इतर लागू कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी-सवलती मिळाव्यात यासाठी सन २०२५ पासून मुख्याधिकारी हे मुख्य नियोक्ता असल्यामुळे त्यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच सहायक कामगार आयुक्त, भंडारा यांच्याकडेही निवेदने सादर करण्यात आली असून सुनावणीची कार्यवाही सुरू आहे.

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १७ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसाचे लक्षवेधी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. त्याची नियमानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी सूचना देण्यात आली होती. मात्र मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १० ते १५ वर्षापासून काम करणाऱ्या ५९ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना, कारणे दाखवा नोटिस, चौकशी अथवा सुनावणीची संधी न देता प्रतिशोधात्मकपणे तडकाफडकी कामावरून बंद करण्यात आला. यासाठी पूर्वीचे कंत्राटीदार राजीव भगत (भगत इलेक्ट्रिक) यांचे घनकचरा संकलनाचे कंत्राट दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सुनिोजितपणे अचानक रद्द करून त्याच दिवशी नवीन कंत्राटदार श्री इकराम पठाण (मे. न्यू ताज इलेक्ट्रिकल स्पेयर पार्ट, वडरा देसाईगंज) यांना त्याच कामाचे कंत्राट देण्यात आले. हे कंत्राट देताना वर्तमानपत्रात जाहिरात दिली नाही, ऑनलाइन निविदा मागविली नाही, कंत्राटदारासोबत कायदेशीर करारनामा केला नाही. जुन्या कामगारांच्या रोवेशी संबंधित कागदपत्रे नवीन कंत्राटदाराकडून उपलब्ध करून घेण्याचे बंधन असतानाही ते न घेता आपल्या खास मर्जीतील इकराम पठाण यांना बेकायदेशीर रित्या कंत्राट देण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे.

कंत्राटदार बदलला असला तरी घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम बंद झालेले नाही. तेच काम, त्याच क्षेत्रात नवीन कंत्राटदारा मार्फत सुरु ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ कंत्राटदार बदलल्याच्या कारणावरून अनेक वर्षापासून काम करणाऱ्या ५९ कामगारांना कामापासून वंचित ठेवणे हे त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम करणारे आहे. विभागीय आयुक्त आणि उपायुक्त, नागपूर यांनी तातडीने गंभीर दखल घेऊन ५९ कंत्राटी सफाई कामगारांना न्याय द्यावा व त्यांना तातडीने पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, सरचिटणीस अमित खरात, शाखा अध्यक्ष राजकुमार साफोरे, शाखा सरचिटणीस लोकेश उकरे यांच्यासह कामगारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *