ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी जिल्हा कचेरीसमोर सत्याग्रह
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: ओबीसींची खरी लोकसंख्या किती, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय, याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसेल तर सामाजिक न्यायाच्या योजना आणि आरक्षणाचे नियोजन नेमके कशाच्या आधारावर होणार? असा थेट सवाल उपस्थित करत ओबीसी संघर्ष समिती आणि सकल ओबीसी महामोर्चाने गुरुवारी (२ ऑक्टोबर) जिल्हा कचरीसमोर सत्याग्रह करीत केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला.
आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम आणि संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ लागू न केल्यास जनगणनेत सहभागी न होण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सत्याग्रहाला
सुरुवात करण्यात आली. ओबीसी समाजाची संख्या देशात मोठी असताना जातनिहाय अचूक आकडेवारीच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातींप्रमाणे स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलनातून पुढे आली.
ओबीसींची वास्तविक लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती समोर आली नाही तर शिक्षण, रोजगार, आरक्षण, अर्थसंकल्पीय तरतुदी आणि कल्याणकारी योजनांचे नियोजन प्रभावित होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल, तर ओबीसींचा सहभाग नसेल, अशी ठाम भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. या संदर्भातील निवेदन भंडारा तहसीलदार माकोडे यांच्यामार्फत राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी आ. नानाभाऊ पटोले उपस्थित होते.








