मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याचा प्रेरणादायी संकल्प
भंडारा येथील ७३ वर्षीय प्रसन्नकुमार कुवरलाल जैन यांचा मरणोत्तर देहदानाचा निर्णय
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- समाजहिताची जाणीव आणि वैद्यकीय शिक्षणायला हातभार लावण्याच्या उद्देशाने भंडारा शहरातील आझाद वॉर्ड, मेन रोड येथील रहिवासी प्रसन्नकुमार कुवरलाल जैन (वय ७३ वर्षे) यांनी मरणोत्तर देहदानाचा प्रेरणादायी संकल्प केला आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे मरणोत्तर देहदानासाठी संकल्पपत्र भरून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मरणोत्तर देहदान हे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी देहदानाचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे भावी डॉक्टरांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच समाजाला दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासही मदत होते. या उपक्रमातून ‘मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे’ हा मानवतावादी संदेश दिला जातो.
देहदानाचा संकल्प हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि भावी पिढीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी दिलेले अमूल्य योगदान आहे. त्यामुळे नागरिकांनीही अशा मानवतावादी उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडाराच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक तथा ऑर्गन ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर अरविंद शंभरकर यांनी कुवरलाल जैन यांच्या निवासस्थानी जाऊन मरणोत्तर देहदानाचे संकल्पपत्र स्वीकारले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडाऱ्याच्या वतीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केल्याबद्दल प्रसन्नकुमार कुवरलाल जैन यांचे अभिनंदन करण्यात आले.








