भंडारा जिल्ह्यात पावसाची स्थिती बरं, शेतकऱ्यांनी चिंता करू नये

एसवायआरचा निर्णय योग्य, अपप्रचार थांबवा;खा. प्रफुल्ल पटेल यांचे पत्रपरिषदेत आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शेती, उद्योग, रस्ते विकास, गुन्हेगारी आणि राष्ट्रीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली.

यावेळी खा. पटेल म्हणाले, विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती थोडी बरी आहे. कमी पाऊस झाला असला तरी अजून एक-दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असून ती लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. कर्जमाफीचा लाभ भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचोला असल्याचा दावा त्यांनी केला.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर बोलताना पटेल म्हणाले, विशेषतः तुमसर विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी आपण नुकतीच खा. राजेंद्र जैन, आ. राजू कारेमोरे यांच्यासह दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्गामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा मोठा विकास होणार आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी जागा द्यावी, त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

औद्योगिक विकासावर बोलताना पटेल म्हणाले, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आजच चर्चा झाली असून भेल प्रकल्पाबाबत मुख्यमंत्रींसोबत दिल्लीत बैठक लावण्यात आली आहे. शेतकरी आपली जागा परत मागत असून त्यांची मागणी रास्त आहे. परंतु तेथे उद्योगन स्थापन झाला पाहिजे, हे आपले स्पष्ट मत आहे. जेणेकरून शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना फायदा होईल. भिलेवाडा येथील उद्योगही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नाव न घेता खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर टोला लगावला. उद्योगासाठी आपण प्रयत्न करतो, पण इतरांची भूमिका काय? फक्त कुठेही जाऊन उभे राहून घोषणाबाजी केल्याने काम होत नाही, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय राजकारणावर बोलताना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया पवार यांची निवड नियमानुसार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘झेन जी’ आंदोलनबाबत केंद्र सरकारने भावना समजून घेऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि नीट मंडळणावर कारवाई करून योग्य निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना होणार असून एसवायआरचा निर्णय योग्य आहे. एकाच मतदारसंघाचे नाव अनेक ठिकाणी असल्याने खऱ्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी एसवायआर आवश्यक असून त्याबाबत काही लोग अपप्रचार करत आहेत. असेही ते म्हणाले. वंदे मातरम हे देशाचे प्रतीक असून त्याला राष्ट्रगान म्हणून सन्मान देण्यात आला आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. स्वातंत्र्य लढ्यात सर्व पक्षांचे योगदान होते, त्यामुळे काँग्रेसने एकट्याने श्रेय घेऊ नये, असेही पटेल म्हणाले. यावेळी खा. राजेंद्र जैन, आ. राजू कारेमोरे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *