नव्याने झालेला डांबरीकरण रस्ता दोन महिन्यातच उखडला
ढिवरवाडा ते मांडवी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
संबंधित अधिकारी व कंट्राटदारावर कारवाईची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी राज्यमार्गावरील ढिवरवाडा ते मांडवी या दोन किलोमीटर रस्त्याचे नव्याने झालेले डांबरीकरण अवघ्या दोन महिन्यातच उखडण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खडकी, ढिवरवाडा, मांडवी परिसरातील हा रस्ता कित्येक वर्षांपासून रखडला होता. नागरिकांच्या सततच्या आंदोलनानंतर प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याच्या कामाला सुरवात केली. मात्र ढिवरवाडा वरून मांडवीकडे जाणारा दोन किमीचा डांबरीकरण केलेला रस्ता आता उखडत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, ‘पहिल्याच पावसात डांबरीकरण उखडत असेल तर काम किती निकृष्ट दर्जाचे झाले असेल याचा अंदाज येतो. पुढे आणखी मोठे खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता आहे.’
रस्ता उखडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही पाहणी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
ज्या कंट्राटदाराला रस्त्याचे टेंडर देण्यात आले आहे त्याचे बिल तात्काळ थांबवण्यात यावे. निकृष्ट दर्जाचे झालेले डांबरीकरण उपटून पुन्हा नवीन रस्त्याचे काम करण्यात यावे. यास जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
करोडो रुपये खर्च करूनही दर्जातहीन काम झाल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देऊन रस्ता पुन्हा नव्याने करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.








