पांदण रस्त्याचे काम न करताच १ लाख १९ हजार ७८५ ची उचल
करडी येथे ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोठा घोटाळा उघड
बनावट हजेरी, बनावट मास्टर; तत्काल कारवाईची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी गावातील ग्रामीण रोजगार हमी योजनेतील १ पांदण रस्ता – नेरकर पटवारी ते आनंदराव साठवणे या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामाचा एकही खड्डा न खोदता १ लाख १९ हजार ७८५ रुपये उचलण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील ७ लाख ५१ हजार रुपये देखील वाट लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
संबंधित इंजीनियर रमेश चौधरी यांच्या आशीर्वादाने आणि काही पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोपाची तक्रार दि. ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा, खंड विकास अधिकारी मोहाडी, पंचायत समिती सभापती मोहाडी यांच्याकडे दिली आली आहे. तक्रारदारांनी संबंधित अधिकारी व इंजीनियर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी छगनलाल लोंडसे, सुधाकर लांजेवार, अभिजित बाकनकर, गजानन भडके, सुरेश तुमसरे, दिपक तुमसरे, दामोदर तुमसरे, बाबुलाल उकरे, मुनेश्वर तुमसरे, रोशन तुमसरे, पुंडलिक ढबाले, डी.एम. साठवणे, पुरुषोत्तम ढोमणे, प्रशांत बावनकर, वामन नेरकर, चंद्रशेखर शहारे, राजकुमार नेरकर, रामलाल नेरकर, हगरू खंदरे, राजकुमार तुमसरे, भुवनेश्वर लोंडसे, नारायण उरकडे, मधुकर टांगले व इतर शेतकऱ्यांनी सहानिशी तक्रार केली आहे.
२२ लाखाचा रस्ता कागदावर, वास्तवत चिखल!
छगनलाल पांडुरंग लोंडसे व इतर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदर पांदण रस्त्यासाठी पंचायत समिती मोहाडीने २२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु आजतागायत रस्त्यावर एकही दिवस मातीकाम किंवा मुरूमकाम झालेले नाही. रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे कि پایी चालणे देखील मुश्किल झाले आहे. आज पर्यंत १ लाख १९ हजार ७८५ रुपयांची उचल केली आहे आणि ही सर्व रक्कम भ्रष्टाचाराच्या विळख्यात गेली आहे असे तक्रारीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
बनावट हजेरीचा भांडाफोड़
या घोटाळ्यामागे मोठे संगनमत असल्याचा आरोप असून कुठल्याही कामाचे फलक लावण्यात आला नाही. म्हणजे काम झालेच कुठे असा प्रश्न निर्माण होतो आहे. बनावट मास्टर कंट्राटी कर्मचारी, रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून बाहेरगावी असणारे, चालता-फिरता येत नाही असे वृद्ध आणि महिला यांची नावे मस्टरमध्ये टाकून शासकीय निधी हडप केल्याचा प्रकार शेतकऱ्यांकडून होतो आहे.
शासनाचा निधी लाटणाऱ्यांवर कारवाई होणार का, की फाईलमध्ये दाबला जाणार? हा प्रश्न आता संपूर्ण मोहाडी तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.








