बालिकेवरील अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा; आ. नाना पटोले यांची पत्रकार परिषदेत मागणी
आठ दिवसांत जन आंदोलन करण्याचा इशारा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेला अत्याचार अत्यंत संतापजनक असून पीडितेला पुणे प्रकरणाप्रमाणे ५५ दिवसांत न्याय मिळावा, अशी मागणी पटोले यांनी केली. ‘सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात ४५ महिला व मुली बेपत्ता आहेत. पालकमंत्री स्वतः गृहराज्यमंत्री असताना त्यांच्याच जिल्ह्यात अशा घटना घडतात, म्हणजे कायद्याचा धाकच राहिला नाही,’ असा घणाघात त्यांनी केला.
शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
आ. पटोले पुढे म्हणाले, सध्या शेतीचा हंगाम असून जिल्ह्यात १० हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध असताना कृषी केंद्रांवर २६० रुपयांची बॅग ५०० रुपयांना विकली जात आहे. कृषी, पोलीस व महसूल विभागाने संयुक्त धाडी टाकाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बियाण्यांचे २१ नमुने बोगस निघाले असून बोगस खते बाजारात विकली जात आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व लूट होत आहे. ही शेतकऱ्यांची लूट थांबावी, तसेच धान व मक्याचे पैसे अद्याप दिले नाहीत. शेतकऱ्यांना तात्काळ ते पैसे द्यावेत, अन्यथा ८ दिवसांत मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, मनरेगाचे नाव बदलून जी रामजी योजना आणून रामाच्या नावाने पैशांची लूट सुरू आहे. हर घर जल योजनेसाठी रस्ते खोदून ठेवले, मात्र घरोघरी पाणीच पोहोचले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मात्र केंद्र सरकारला पाणी घरात पोहोचले असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या निवेदनावर कारवाई करण्यात आली नाही तर आठ दिवसांत जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.








