पावसात गरिबांची घरे कोसळली; भंडारा रेडक्रॉसने दिला मदतीचा हात
सकटाच्या काळात मदत, किटचे वाटप
भंडारा रेडक्रॉसने जपली मानवतेची ज्योत
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- साकोली तालुक्यातील सालेबर्डी येथील धनंजय जगन कोरे तसेच साणगडी येथील देविदास झिदू मुरखे यांची मातीची घरे दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. पाहता पाहता या दोन्ही गरीब कुटुंबांची घरे जमीनदोस्त झाली आणि त्यांच्यासमोर राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.
मुसळधार पावसामुळे घरे राहण्यायोग्य न राहिल्याने दोन्ही कुटुंबांना नाईिलाजाने दुसऱ्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. या संकटाची माहिती मिळताच भंडारा जिल्हा रेडक्रॉसने मानवतेची जाणीव जपत बाधित कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. जिल्हा सचिव डॉ. नितीन तुरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेडक्रॉसच्या वतीने दोन्ही बाधित कुटुंबांना मदत व आवश्यक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. ही मदत साणगडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता उपरीकर, रेडक्रॉसचे सदस्य राजू खवसकर तसेच सालेबर्डीच्या सरपंच श्रीमती शशिला रामटेके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपत्तीच्या काळात गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविणाऱ्या रेडक्रॉसच्या कार्याचे कौतुक केले. नैससर्गिक आपत्तीच्या काळात केवळ मदत करणेच नव्हे, तर संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी मानवता आणि सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी रेडक्रॉसचे ज्येष्ठ सदस्य रामभाऊ ब्रह्मपूरकर, ग्रामपंचायत सदस्य के.तन बारस्कर, कुलदीप धकाते, कृषी अधिकारी सपाटे, कृषी सहायक कु. मेघा मेश्राम, एकनाथ खर्डकर, नरेश सहारे, मिलिंग रंगारी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
मुसळधार पावसाने गरीब कुटुंबांचे आशियाने हिरावून घेतले; मात्र या संकटाच्या काळात भंडारा रेडक्रॉसने मदतीचा हात पुढे करून मानवता आणि सामाजिक संवेदनेचा परिचय दिला. गरजू कुटुंबांपर्यंत वेळेवर पोहोचविलेली मदत हेच सिद्ध करते की, संकटाच्या काळात पीडितांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी मानवसेवा आहे.








