प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; बी. एल. ओ. च्या पडताळणीवर प्रश्नचिन्ह
दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून येत असून संबंधित बी. एल. ओ. यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली आहे का, याबाबत प्रश्न निर्माण होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, भंडारा यांना निवेदन देऊन अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी फेरपडताळणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत बी. एल. ओ. यांच्यावर मतदारांच्या घरोघरी जाऊन नाव, पत्ता, घर क्रमांक यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची जबाबदारी होती. मात्र प्रारूप यादीच्या प्राथमिक निरीक्षणात भंडारा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून येत आहेत. विशेषतः अनेक मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाच्या रकान्या ‘शून्य’ नमूद आहे. अनेक ठिकाणी घर क्रमांकाऐवजी गावाचेच नाव टाकण्यात आले आहे. तर काही ठिकाणी एकाच घर क्रमांकावर ५०, ७०, ८० ते जवळपास १०० मतदारांची नावे दाखवण्यात आली आहेत. यादीच्या सुरुवातीच्या, मधल्या पानांवर अशा त्रुटी मोठ्या प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ मतदारांनी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हरकत घ्यावी आणि नंतरच दुरुस्ती करावी, अशी भूमिका योग्य ठरणार नाही, असे वाघमारे म्हणाले.
सामान्य मतदार यादीत आपले नाव आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, एवढेच पाहतो. घर क्रमांक चुकीचा आहेकिंवा त्याजागी गावाचे नाव आहे, ही तांत्रिक बाब त्याच्या लक्षात येईलच असे नाही. त्यामुळे हरकत आली नाही म्हणून ती नोंद योग्य आहे असे गृहीत धरता येणार नाही. हा प्रश्न वैयक्तिक नसून मतदार यादीच्या अचूकतेशी आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे. लोकशाहीत अचूक मतदार यादी हा मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीचा आधार असून प्रशासनाने मतदारांची वाट न पाहता स्वतः दखल घ्यावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांनाही पाठविण्यात आली आहे.








