शेतकऱ्याने पणन अधिकारी कार्यालयातच वाहिली श्रद्धांजली

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रब्बी हंगामातील धान मे २०२५ मध्ये खरेदी केंद्रावर विकले, पावतीही मिळाली… मात्र त्या धानाचे चुकते अद्याप मिळालेच नाहीत. ज्या पैशांची वाट पाहत शेतकरी दिवस ढकलत राहिला, तेच पैसे वेळेवर न मिळाल्याने आजारी आई-वडिलांवर उपचार करता आले नाहीत आणि दि. १५ सप्टेंबर रोजी अवघ्या एका तासाच्या अंतराने आईवडिलांचा दुर्दैवी अंत झाला. काळजात कोरलेल्या या वेदनेसह भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील शेतकरी प्रशांत खोब्रागडे यांनी बुधवारी थेट जिल्हा पणन अधिकारी कार्यालय गाठले. हातात होती आई-वडिलांच्या चौदाव्याची पत्रिका! तीच पत्रिका जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या हातात देत, “धानाचे पैसे मिळाले नाहीत आणि मी आई-वडील गमावले’ अशी हृदयद्रावक व्यथा त्यांनी मांडली. कार्यालयाच्या दिरंगाईच्या कारभाराचा निषेध व्यक्त करीत कार्यालयातच अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या आई-वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

हा प्रकार पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत खोब्रागडे यांनी रब्बी हंगामातील आपले धान शासनाच्या आधारभूत खरेदीकेंद्रावर विक्री केले होते. नियमानुसार ७२ तासात पैसे मिळणे अपेक्षित असताना चार महिने उलटूनही पैसे मिळाले नाहीत. यादरम्यान त्यांच्या आईवडिलांची प्रकृती बिघडली. हातात पैसे नसल्याने आणि सावकाराकडे जाण्याची वेळ आल्याने वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर १५ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एका तासाच्या फरकाने दोघांचाही मृत्यू झाला. हा केवळ एका कुटुंबाचा आक्रोश नाही, तर भंडारा जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आहे. जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पणन विभागाकडे थकीत असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांनी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वरवर दिसायला ही घटना श्रद्धांजलीची वाटत असली तरी हा शासनाच्या यंत्रणेवरचाएक गंभीर प्रश्न आहे. वेळेवर पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याला आपल्या जन्मदात्यांना गमवावे लागले, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? या घटनेमुळे पणन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, थकीत चुकते तात्काळ देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *