जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच प्रयत्न करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात सध्या थेट दुष्काळसदृश परिस्थिती नसली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाच्या तुटीमुळे काही भागांत धान व इतर पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. विशेषतः धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. भोयरयांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, जलाशयांमधील पाणीसाठा, सिंचन व्यवस्था,पिकांची सद्यस्थिती तसेच संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, खासदार प्रशांत पडोळे, आमदार राजू कारेमोरे, आमदार डॉ. परिणय फुके, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदासी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता खोब्रागडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. बावनथडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गतवर्षी या प्रकल्पात सुमारे ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र हा साठा केवळ ३५ ते ३६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळेशेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.

धान पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे धान उत्पादक भागात सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन झालेच पाहिजे. पाण्याचा वापर, उपलब्ध साठा आणि आगामी गरज यांचा विचार करून कृषी व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सिंचनाची उपलब्धता वाढविण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेती व पिण्याच्या पाण्याचे आतापासूनच योग्य नियोजन करावे, असे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *