कर्ज आणि वीजबिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय भेंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही ऐतिहासिक योजना असून कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार संजय भेंडे यांनी केले. विश्रामगृह भंडारा येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, न. प. उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, भगवान चांदोवार, कल्याणी निखाडे उपस्थित होते.
आ. भेंडे म्हणाले, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेते ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत ५० हजार रुपयांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना आता २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रद्द करण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रीयकृत, व्यापारी, खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पूर्वी २ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना लाभ मिळत नव्हता, मात्र आता अधिक थकबाकी असली तरी २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. यामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे.
आ. भेंडे यांनी पुढे सांगितले की, कृषी क्षेत्रासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे १५ हजार कोटी खर्च करते. कापसाची १३६ लाख क्विंटल खरेदी करून १० हजार ८८३ कोटी रुपयांचे चुकते अदा करण्यात आले, सोयाबीनचे ६ लाख टन उत्पादन ३ हजार ११९८ कोटी रुपयांच्या खरेदी करण्यात आले. कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली. ठिबक सिंचनासाठी प्रलंबित २१७ कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील.
कोणतीही निवडणूक समोर नसताना सरकारने हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून राजकारण न करता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीत नव्या पद्धती, नवे तंत्रज्ञान आणणे गरजेचे असून गटशेती, नैसर्गिक शेती, देशी गार्यीचे संवर्धन आणि जलयुक्त शिवारामुळे शेतकरी तीन-तीन पिके घेऊ लागला आहे.
राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण असताना गोदावरी, तापी खोऱ्यातील समुद्रात वाया जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा नदीजोडीतून वळवून २४ नवे धरणे आणि १६ जुन्या धरणांची उंची वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरवर्षी पुरे २०० टीएमसी पाणी वळवून बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असून विदर्भ, मराठवाड्यात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही. अजून सहा लाख कोटींची कामे करण्याची योजना असून वीजबील थकबाकीमुळे महावितरणचा तोल सावरण्यासाठी सरकारने ३२ हजार ६७९ कोटींचे कर्ज स्वतःकडे घेतल्याचेही आ. भेंडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार
राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबील आकारले जात नाही, मात्र त्यांची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांची थकीत वीजबिलाची पाटी पूर्णपणे कोरी होणार आहे. यासाठी दरवर्षी २५ हजार कोटींची वीजबील माफी दिली जात असून ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. वर्षा अखेरपर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाईल. सौरपंप आणि सौरकृषी वाहिनी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. असेही ते म्हणाले.








