बावनथडी प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी तातडीने सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील धान पीक पावसाच्या अनियमितেমुळे धोक्यात आले आहे. शेतातील पिकांना वाचवण्यासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तातडीने सोडण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे. यासंदर्भात वाघमारे यांनी भंडारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी केली आहे.
माजी आमदार चरण वाघमारे यांचा इशारा
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण मुख्यत्वे धान पिकावर अवलंबून आहे. सध्या हे पीक वाढीच्या व निसवण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मात्र, पावसाने मारलेली ओढ आणि अनियमितেমुळे शेतात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून धान पीक करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर पाणी मिळाले नाही, तर शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे.
बावनथडी प्रकल्पामध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही प्रशासनाकडून कालव्यांमध्ये पाणी सोडण्यास विलंब होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, ‘बळीराजाला संकटातून बाहेर काढणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कसलाही विलंब न करता बावनथडीचे पाणी तात्काळ शेतीसाठी मोकळे करावे.’
पाणी सोडण्याच्या मागणीसाठी प्रशासनाने टाळाटाळ केल्यास परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.








