शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांचे मागील वर्षीचा बोनस तात्काळ जाहीर करावा, अन्यथा आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राज्याच्या महायुती सरकारने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२५-२६ वर्षाकरिता बोनसबाबत योग्य भूमिका घेऊन लवकरच बोनस जाहीर करण्यासंदर्भात अधिवेशनामध्ये घोषणा केलेली होती, परंतु अनेक महिने उलटली तरी राज्य शासन मात्र या संदर्भात बोलायला तयार नसून, घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर धानाला बोनस जाहीर करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निवेदनातून करीत आहे.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट अशीच आहे. एकीकडे ‘अल निनो’ मुळे दुष्काळसदृश परिस्थिती झालेली असताना हातात पीक येईल की नाही याच चिंतेत शेतकरी आहे. त्यालत्या त्यात धानासारख्या पिकाला जास्त पाण्याची गरज असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा चिंतेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेली पर्जन्यवृष्टी ही सरासरीपेक्षा कमीच असून आता हळूहळू खोडकिडा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

सन २०२४-२५ मध्ये राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करून त्यांना छोटासा मदतीचा हात दिला होता. परंतु २०२५-२६ या वर्षाकरिता अधिवेशनात यावर्षी सुद्धा बोनस देण्याचे जाहीर केले होते. आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्याबाबदची घोषणा न केल्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने वाट बघत आहे. दरवर्षी येणारी नापिकी, कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळ, रोगांचा प्रादुर्भाव हे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. त्यामुळे आजही जिल्ह्यात आणि राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र दुर्दैवाने सुरूच आहे.

सत्ताधारी पक्षातील काही नेते हयावर्षी शासनाने कर्जमाफी केली. त्यामुळे बोनस मिळणार नसल्याचे सांगतात. परंतु शासनाने केलेली कर्जमाफी हे बँकांना दिली, शेतकरी बांधवांच्या हातात तर काहीही पडले नाही, शिवाय केलेली कर्जमाफी ही सुद्धा सरसकट न करता, अटी शर्ती लावूनच केल्यामुळे त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळणार नाही याची सुद्धा काळजी घेतली गेली.

एकीकडे मोठमोठ्या उद्योगपतींना हजारो करोडो रूपयांची कर्जमाफी दिली जाते परंतु जो जगाचा पोशिंदा आहे, जो रात्रदिवस राबून रक्ताचे पाणी करतो, त्याला मदत देताना मात्र सरकारने हात आखुड न ठेवता तात्काळ मागील वर्षीच्या हंगामासाठी बोनस जाहीर करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत असून असे न झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक साव्हें, शहर प्रमुख राकेश आग्र्ये, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उप तालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, उपशहर प्रमुख प्रकाश गभने, राजेश ठवकर, विभाग प्रमुख अनिरुद्ध गाढवे, नितेश गभने, कृष्णा नागपुरे, हिमांशू भाजीपाले, संतोष चांदीवार, रोशन दहेलकर, शामराव मालखंडाळे, निलेश चामट इत्यादी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

निवेदनायाच्या प्रतिलिपी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना नेते आ. अंबादास दानवे, आ. अनिल परब यांना दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *