श्वेता पोटुडे यांनी स्वीकारला माहिती अधिकारी पदाचा कार्यभार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत श्वेता पोटुडे यांनी मंगळवारी भंडारा जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
यावेळी भंडारा जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्वेता पोटुडे यांचे स्वागत केले. तसेच या प्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विजय जाधव, कनिष्ठ लिपिक रुपाली उगे, घनश्याम सपाटे आणि रेखा निनावे उपस्थित होते. श्वेता पोटुडे यांनी यापूर्वी नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून कार्य केले आहे. तसेच हिंगोली, वर्धा, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.








