भीतीने झाडाच्या शेंड्यावर चढली मादी बिबट; शेतकऱ्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये दहशत बीबीटोला घटनेने वनविभागाच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह

पूर्वसूचना असूनही प्रतिबंधत्मक उपाय अपुरे; पिलांसह बिबटीनीला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम
दैनिक लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- जंगल आणि मानवी वस्त्यांमधील वाढता संघर्ष पुन्हा एकदा गोंदिया तालुक्यातील बीबीटोला येथे ठळकपणे समोर आला आहे. दोन पिलांना नुकताच जन्म दिलेल्या मादी बिबटीने सोमवारी ३ ऑगस्ट रोजी शेतकरी राजभुवन भैयालाल अंबुले (४०) यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे गदड सावत पसरले आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात बिबटीचा वावर असल्याची माहिती यापूर्वीच वनविभागाला देण्यात आली होती. त्यामुळे वेळेवर प्रतिबंधत्मक उपाय का झाले नाहीत, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

शिकारीची ठरली सावज… !
हल्ल्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या गोंधळात गावातील मोकाट कुत्र्यांनी मादी बिबटचा पाठलाग केला. आपल्या दोन निष्पाप पिलांचे रक्षण करण्यासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती शेतातील एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसली. एरवी शिकारीच्या आवेशात दिसणारी मादी बिबट भितीने झाडावर आसरा घेत असल्याचे दृश्य अनेकांनी मोबाईलमध्ये टिपले. ही चित्रफीत समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून, मानवी हस्तक्षेप आणि वन्यजीवांच्या बदलत्या वर्तनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामस्थांच्या पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मादी बिबट आपल्या दोन पिलांसह अनेक दिवस गावालगटच्या परिसरात वावरत होती. याबाबत वारंवार सूचना देऊनही पिंजरा लावणे, गस्त वाढविणे किंवा विशेष बचाव मोहीम तातडीने राबविण्यात आली नाही. परिणामी, हल्ल्याची घटना घडल्याने वनविभागाच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या भातपिकाची रोवणी पेरणी चा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि मजूर वर्गाला रोज जंगललगतच्या शेतात जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

विशेष पथकाची मोहीम
घटनेनंतर वनविभागाने विशेष पथक तैनात करून मादी बिबट्याच्या हलचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी जंगललगतच्या भागात एकटे जाणे टाळावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘पिलांसह सुरक्षित पकडणे हेच मोठे आव्हान’
गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमणे यांनी सांगितले की, मादी बिबट नुकतीच दोन पिलांना जन्मलेल्या असल्याने तिला आणि तिच्या दोन्ही पिलांना सुरक्षितपणे जेरबंद करणे हे अत्यंत संवेदनशील काम आहे. विशेष बचाव पथक आणि संपूर्ण वनविभाग समन्वयाने कार्यरत असून, मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कोणत्याही परिस्थितीत मादी बिबट ला पिलांसह सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. आज सकाळी गावात या प्रकरणी दवंडी देण्यात आली आहे या मोहिमीत ग्रामस्थांनी सहकार्य करावे आणि कोणताही अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

दीर्घकालीन उपायांची गरज
बीबीटोला येथील घटना ही केवळ एका हल्ल्यापुरती मर्यादित नसून, वाढत्या मानवी-वन्यजीव संघर्षाचा गंभीर इशारा आहे. जंगलांचे आकुंचन, मानवी अतिक्रमण यामुळे वन्यजीव गावांकडे वळत असल्याचे वास्तव या घटनेने दिसून येते. तात्पुरत्या उपायापेक्षा नियमित गस्त, जनजागृती आणि वन्यजीव व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच अशा घटनांना आळा घालणे शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *