तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण ३१ जुलै रोजी इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ

दै. लोकजन वृत्तसेवा

भिवंडी:- भिवंडी शहरातील गंगाराम वाडी परिसरात असणारी ‘कोहिनूर इ विंग’ ही चार मजली धोकादायक इमारत अचानक कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. इमारत अत्यंत जर्जर झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच घर सोडून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या संतोष कुमार पांडे यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. धोकादायक इमारतीत नक्की काय काम सुरू आहे हे पाहण्यासाठी ते गेले असता अवघ्या पाच मिनिटांत इमारत पत्त्यासारखी खाली कोसळी.

नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम वाडी येथील कोहिनूर ‘इ’ विंग ही इमारत अत्यंत धोकादायक व जर्जर झाली होती. त्यामुळे संतोष कुमार पांडे यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांचा स्वतःचा फ्लॅट रिकामा केला होता. ते रात्रीच्या वेळी आपल्या हॉटेलमध्येच झोपण्यासाठी जात असत. दरम्यान, या जर्जर इमारतीमध्ये खाली पिलरचे काही काम सुरू होते. इमारतीत नक्की काय चालले आहे आणि काम कशा प्रकारे सुरू आहे, हे पाहण्यासाठी संतोष पांडे हे इतर काही लोकांसोबत इमारतीजवळ गेले होते. ते पोहचल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत संतोष पांडे यांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर स्थानिकांचा संताप
स्थानिकांनी महापालिका व प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या इमारतीला प्रशासनाकडून आधीच धोकादायक घोषित करण्यात आले होते आणि अपघाताच्या आदल्या दिवशीच तिसरी नोटिस देण्यात आली होती. इमारत धोकादायक असतानाही खाली पिलरचे काम सुरूच होते. प्रशासनाने कडक पावले उचलून काम तातडीने बंद पाडले असते, तर ही दुर्घटना टळली असती.

कुटुंब अनाथ; सरकारकडे मदतीची मागणी
संतोष पांडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि लहान मुलं असा परिवार आहे. कमावता पुरुष गेल्याने हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. ‘भिवंडीत बारकाईने आणि कडक कारवाई करून अशा धोकादायक इमारतीमधील कामे तात्काळ बंद करून परिसर रिकामा करून घेतला पाहिजे. आज एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला असून त्याच्या अनाथ झालेल्या कुटुंबाला आणि बालकांना सरकारने आर्थिक आधार व मदत द्यावी,’ अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *