वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पातील अडथळे दूर, कामांना पुन्हा वेग
जानेवारीपासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- वैनगंगा नदीवरील बहुप्रतिक्षित जलपर्यटन प्रकल्पाच्या कामात आलेला अडथळा दूर झाला असून आता या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांना पुन्हा गती मिळाली आहे. इतकेच नाही तर या पार्श्वभूमीवर भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाच्या कामाला लवकरात लवकर पूर्ण करून प्रथम टप्प्यातील पर्यटन १ जानेवारी २०२७ पासून सुरू करण्याचा निर्धार घेतला.
उल्लेखनीय आहे की, भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदीवर आंतरराष्ट्रीय जल पर्यटन तयार करण्याचे स्वप्न आं. नरेंद्र भोंडेकर यांनी बघितले होते आणि याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत प्रथम टप्प्याकरिता १० कोटी ला तत्काळ मंजुरी दिली आणि याचे काम सुरु करण्यात आले. गेल्या काळात आलेल्या अडचणींमुळे याची कामे थांबविण्यात आली होती आणि नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधान आले होते.
आता या अडचणी दूर झाल्या असून या प्रकल्पाला गोसे खुर्द विभागाकडून न हरकत प्रमाणपत्र देण्यात आला आहे. हे पत्र प्राप्त होताच आं. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील जल पर्यटनाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार भोंडेकर यांनी प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या्या १ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्धार व्यक्त करत कामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सर्व कामे दर्जेदार, सुरक्षित आणि निश्चित मुदती पूर्ण करण्यावर भर देत आवश्यक यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जल पर्यटनाच्या प्रथम टप्प्यात भंडारा-१, कोरंभी, पाहेल/मौदी, अड्याळ/चकरा व गोसे येथे जलपर्यटनाचा प्रवेश मार्ग देण्यात येत असून भंडारा ते पवनी पर्यंत एकूण १५ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात भंडारा ते तुमसरचे नदीपात्र गाठणार
गोसे जल पर्यटन हे भंडाराचे नाव जागतिक स्तरावर नेणार असल्याने या प्रकल्पाकडे भंडाराच्या हजारो नजरा टिपल्या आहेत. अश्यात या प्रकल्पाला विस्तारित करण्याची मागणी सुद्धा होऊ लागली आहे. ज्या करिता भंडारा ये पवनी या मधील दोन्ही टप्पे पूर्ण होण्या पूर्वी भंडारा ते तुमसर या मध्ये वाहणारी वैनगंगा नदीतच तिसरा टप्पा सुरु करण्यारचा निर्धार घेतला असल्याचे आम. भोंडेकर यांनी सांगितले. या तिसऱ्या टप्प्यात मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील हजारो हातांना रोजगार मिळू शकेल. ज्या करिता तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.








