अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांची विविध कार्यालयांची पाहणी
नागरिकांशी साधला संवाद, तुमसर येथे वृक्षारोपण
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शुक्रवारी भंडारा जिल्ह्याचा दौरा करून महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी दिल्या. याबेळी त्यांनी कार्यालयातील अभिलेख व दस्तऐवजांचे व्यवस्थापन, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली. विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांना कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना देतानाच भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या.
दौऱ्याच्या प्रारंभी खारगे यांनी भंडारा येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपनिबंधक प्रकाश ढगे यांनी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाची, अभिलेख व्यवस्थापनाची तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती खारगे यांना दिली. त्यानंतर त्यांनी मोहाडी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच आंधळगाव येथील टसर सिल्क युनिटला भेट देऊन तेथील कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.
नंतर खारगे यांनी तुमसर येथील उपनिबंधक (मुद्रांक) कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आं. राजू कारेमोरे यांनी खारगे यांची भेट घेऊन विविध स्थानिक विकासकामे व महसूल विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा केली.
संपूर्ण दौरदरम्यान जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत होते. विविध ठिकाणांच्या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. आवश्यक सूचना दिल्या तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.








