मोहाडी न.पं. उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव बहुमताने पारित

१५ विरुद्ध १ मतांनी ठराव मंजूर
पुढील उपाध्यक्षपदासाठी मनीषा गायधने यांच्या नावांची चर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा

मोहाडी : मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत १५ विरुद्ध १ मताने बहुमताने पारित झाला. विशेष म्हणजे, अविश्वास ठरावाच्या वेळी उपाध्यक्ष सचिन गायधने हे सभेला अनुपस्थित होते.

मोहाडी नगरपंचायतीच्या १७ सदस्यांपैकी १५ नगरसेवकांनी उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. यातील १३ नगरसेवक सहलीवर गेल्याने या अविश्वास प्रस्तावाभोवती राजकीय चर्चांना उधान आले होते.

अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी नगरपंचायतीच्या अध्यक्ष छाया डेकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी निलेश इंगोले उपस्थित होते. सभेत उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आल्यानंतर मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने १५ नगरसेवकांनी मतदान केले, तर विरोधात केवळ एका सदस्याने मतदान केले.

बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सचिन गायधने यांना उपाध्यक्षपद गमवावे लागले आहे. आता मोहाडी नगरपंचायतीच्या पुढील उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनीषा गायधने यांचे नाव पुढील उपाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *