रानडुकरांच्या हल्ल्यात ९ शेतकरी जखमी…विजेच्या सापळ्याची शोकंतिका; गोरेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन दुर्घटनांनी अस्वस्थता
दें. लोकंजन वृत्तसेवा
गोंदिया :- गोरेगाव तालुक्यात बुधवारी घडलेल्या दोन गंभीर घटनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला रानडुकरांच्या हल्ल्यात नऊ शेतकरी जखमी झाले, तर दुसऱ्या बाजूला वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या कथित अवैध विद्युत सापळ्याचा फटका बसून नवाटोला (तेढा) येथील जन्मतः मुकबधिर शेतकरी चंद्रकुमार दिंबर येळे (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन घटनांनी संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून, वन्यजीव व्यवस्थापन आणि ग्रामीण सुरक्षेत ती पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकुमार येळे हे बुधवारी सकाळी घरालगतच्या शेनखताच्या खड्ड्यात शेण टाकून परत येत असताना शेजारील शेताच्या धुऱ्यावर असलेल्या सागवानाच्या झाडाची पाने तोडत होते. त्याचवेळी कथिपपणे रोहिरातून बेकायदेशीररीत्या सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा विद्युत सापळा उभारण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून, गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
दुसरीकडे, घुमरी, कलपाथरी आणि पालेवाडा परिसरात सकाळी शेतातील कामे सुरू असताना रानडुकरांच्या कळपाने अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात प्रदीप राऊत, जितेंद्र गावराने, शालू मेश्राम, कुसुम राखडे, लालाजी बामडे, धीरज बामडे यांच्यासह आठ ते नऊ शेतकरी जखमी झाले. गंभीर जखमी राधेश्याम राऊत यांना पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनांची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री तथा गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यांनी गंभीर जखमी राधेश्याम राऊत यांना ५ हजारांची, तर मृत चंद्रकुमार येळे यांच्या कुटुंबीयांना १० हजारांची आर्थिक मदत देत धीर दिला.
गोरेगाव तालुक्यात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे धान, मका आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आता शेतकऱ्यांच्या जिवितालाही धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत तातडीने मंजूर करावी, विशेष गस्त वाढवावी आणि रानडुकरांचा प्रभावी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, आमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श्रेजल आखरे यांनी घटनेची दखल घेत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. नियमानुसार आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एका दिवसात घडलेल्या या दोन दुर्घटनांनी केवळ ग्रामीण सुरक्षेचे वास्तव उघडे केले नाही, तर वन्यजीव संवर्धन आणि मानवी सुरक्षितता यांच्यात संतुलित, दीर्घकालीन धोरणाची गरजही आवश्यक आहे.








