मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षांवरील अविश्वासामागे ‘१२ कोटींची’ खेळी?

कार्यकाल संपण्यास अवघे पाच-सहा महिने; ३१ जुलैला विशेष सभा
दै. लोकजन वृत्तसेवा

मोहाडी :- नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने नगरपंचायत वर्तुळात राजकीय चर्चेला उधान आले आहे. विशेष म्हणजे विद्यमान नगरपंचायतीचा कार्यकाल संपण्यास अवघे पाच-सहा महिने शिल्लक असताना हा प्रस्ताव दाखल झाल्याने यामागे नेमकी कोणती राजकीय खेळी आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

२७ जुलै रोजी नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्यासह १४ नगरसेवकांनी उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्यावर विश्वास नसल्याचे नमूद करीत अविश्वास प्रस्तावासाठी पत्र नगरपंचायतीकडे सादर केले. निधीचा गैरवापर, कर्तव्यात कसूर आणि नगरसेवकांना सहकार्य न करणे, अशी कारणे पत्रात नमूद करण्यात आली असून अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी करण्यात आली असून १३ सदस्य चिखलदरा सहलीवर गेले आहेत.

दरम्यान, जवळपास चार वर्षे नगरपंचायतीतील सत्तेच्या समीकरणार सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. २०२१ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, भाजपाला नऊ तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपच्या छाया डेकाटे अध्यक्षपदी विराजमान झाल्या, तर भाजपचे शैलेश गभणे उपाध्यक्ष झाले. मात्र काही दिवसांतच गभणे यांच्यावर अविश्वास आणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गायधने यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आपल्यावरील अविश्वास प्रस्तावामागे विकास निधीचे राजकारण असल्याचा आरोप उपाध्यक्ष सचिन गायधने यांनी केला आहे. मोहाडी नगरपंचायतीला येणाऱ्या सुमारे १२ कोटी रुपयांच्या विकास निधीच्या लालसेपोटी काही लोक नगरसेवकांना प्रलोभन देत असून, त्याला बळी पडून आपल्या विरोधात अविश्वासाचे पत्र देण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे.

मात्र अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या नगरसेवकांनी निधीचा गैरवापर आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे नगरपंचायतीतील राजकारण तापले आहे.

३१ जुलैला फैसला?
२७ जुलै रोजी अविश्वासाप्रस्तावाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर मोहाडी नगरपंचायतीने ३१ जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत उपाध्यक्ष सचिन गायधने यांच्यावरील अविश्वास प्रस्ताओवर चर्चा होणार आहे. प्रस्ताव पारित होतो की बारगळतो, याकडे मोहाडीकरांचे लक्ष लागले आहे.

या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या
अविश्वास प्रस्तावाच्या पत्रावर रेखा मनोहर हेडाऊ, देवश्री विजय शहरारे, ज्योती नंदनवार, पवन चव्हाण, मनीषा मनोहर गायधने, हेमचंद परते, महेश निमजे, पूनम धकाते, यादवराव कुमारे, अश्विनी प्रवीण डेकाटे, दिशा दिनेश निमकर, सुमन गणेश मेहेर, सविता विलास साठवणे आणि शैलेश गभणे या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगराध्यक्ष छाया डेकाटे यांचीही प्रस्तावला पाठिंबा असल्याचे पत्रातून स्पष्ट होते.

दरम्यान, नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्यासह १३ नगरसेवक चिखलदराच्या सहलीवर गेल्याची माहिती आहे. मात्र महेश निमजे आणि देवश्री विजय शहरारे या दोघांचा या सहलीत सहभाग नसल्याचे समजते.

“माझे खच्चीकरण करण्यासाठी काही लोक नगरसेवकांना १२ कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून देण्याचे प्रलोभन देत आहेत. या लालसेला बळी पडून माझ्याविरोधात अविश्वासाचे पत्र देण्यात आले आहे. मात्र माझा विश्वास आहे की माझ्यावरील अविश्वास ठराव पारित होणार नाही.”

— सचिन गायधने, उपाध्यक्ष, नगरपंचायत मोहाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *