२५ मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात उद्या मोहाडीत धडक मोर्चा
चरण वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी मोहाडीत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सकाळी ११ वाजता चौंडेश्वरी माता मंदिरापासून निघून तहसील कार्यालयावर धडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येत असून या माध्यमातून शासनाकडे २५ प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत. यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
चरण वाघमारे पुढे म्हणाले, यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस तात्काळ देणे, सन २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीत पात्र असूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देणे, कर्जबाजारीपणांमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफी देऊन नो ड्यूज प्रमाणपत्र देणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर मदत देणे, उन्हाळीধানাसाठी खरेदी केंद्र वेळेत सुरू करणे, खत, बियाणे, कीटकांनशकांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवणं या शेतीविषयक मागण्यांचा समावेश आहे. तसेच सर्व बाजार समित्यांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करावीत, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ पेन्शन योजनेची प्रलंबित रक्कम तात्काळ द्यावी, गरजू नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांशिवाय योजनांचा लाभ द्यावा,
मोहाडी नगरपंचायतीची जाचक कर आकारणी रद्द करून परवडणारी कर आकारणी करावी, ऊस उत्पादकांना दरवढ द्यावी, वनहक्क व वनजमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढून वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई वेळेत द्यावी, मनरेगाची प्रलंबित मजुरी अदा करावी या मागण्याही करण्यात येणार आहेत. दिव्यांगांना अनुदान, पेन्शन, एसटी सवलत मिळावी, महिलांना एनसीएमसी कार्डमधील तांत्रिक अडचणी दूर करून एसटी सवलत सुरळीत मिळावी, लाडकी बहीण योजनेतील वंचित पात्र महिलांना लाभ द्यावा, शासकीय शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, तांत्रिक कारणांमुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ द्यावा, झाडीपट्टी कलावंतांना नियमित मानधन द्यावे, पेपरफुटीवर कठोर कारवाई करावी, भूमिहीन कुटुंबांना पट्टे द्यावेत, महाडीबीटीचे अनुदान खात्यात जमा करावे, योजनांचे प्रलंबित हसे वेळेत द्यावेत आणि ढिवर समाजाच्या समस्या सोडवाव्यात, अशा २५ मागण्या या मोर्चातून मांडल्या जाणार आहेत.
या मोर्चानं जिल्ह्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर, लाडक्या बहिणी, युवक व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले असून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सेवादलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, युवक जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, जिल्हा सचिव अजय मेश्राम उपस्थित होते.








