तुम्सरच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला जनतेचा विक्रमी प्रतिसाद

 

*एकाच छताखाली १६ विभागांच्या सेवा

*२,५०० हून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

*८४ पट्टे, १७५ रक्तदाते, महिलांना सातबारा वितरण

दै. लोकजन वृत्तसेवा

तुमसर :- ‘शासन जनतेच्या दारी आणि सेवा प्रत्येकाच्या घरी’ या संकल्पनेला साकार रूप देणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ बुधवारी (दि. २१) तहसील कार्यालय, तुमसर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, कामगार, नोंदणी, आधार, सेतू केंद्र आदी १६ विविध विभागांचे स्टॉल नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होते. परिणामी, सुमारे २,५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला.

राज्य शासनाच्या ९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार तर उद्घाटक म्हणून आमदार राजू कारेमोरे उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सागर गभने, उपनगराध्यक्ष सचिन बोपचे, इंजि. प्रदिप पडोळे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे, बंडू बनकर, पंचायत समितीच्या सभापती श्रीमती गोपाले, उपसभापती बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरातील सर्वाधिक लक्षवेधी उपक्रम म्हणजे ८४ पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरणाचे पट्टे प्रदान करण्यात आले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देत ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेअंतर्गत महिलांना सातबारा सह-खासदार म्हणून नोंद देऊन सातबार्‍याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १५५ अंतर्गत सातबारा दुरुस्ती, फेरफार निकाली काढून ७/१२ व ८-अ उतारे देण्यात आले. याशिवाय एकाच दिवसात ८६ विविध प्रमाणपत्रे तयार करून वितरित करण्यात आली, तर ७ नोंदणीकृत कौटुंबिक वाटणीपत्रे लाभार्थ्यांना स्वाधीन करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या प्रकरणांनाही मंजुरी देण्यात आली.

कृषी मार्फत आधुनिक कृषी अवजारे व ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली, तर १७५ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

शिबिरात प्राविण्यप्राप्त विद्यार्थी, प्रगतिशील शेतकरी आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ शासकीय सेवा वितरणपुरता मर्यादित न राहता गुणवंतांचा सन्मान करणारा प्रेरणादायी सोहळाही ठरला.

प्रास्ताविकात तहसीलदार उपेश आंबाडे यांनी शासनाच्या लोकभिमुख निर्णयांचा आढावा घेत शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती दिली. उद्घाटनपर भाषणात आमदार राजू कारेमोरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

अक्षीय भाषणात जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी डझननेच्या प्रत्येक समस्येचे समाधान हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे, असे ठामपणे सांगत सर्व विभागांनी संवेदनशीलताने काम करण्याचे निर्देश दिले.

उपविभागीय अधिकारी गणेश दिघे यांनीनी नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार संजय जांभूळकर, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच सर्व विभागांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले.

कार्यक्रमचे ओगवते, माहितीपूर्ण आणि प्रभावी सूत्रसंचालन शारदा विद्यालयचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी करून उपस्थितींची मने जिंकली. तहसीलदार (मोहाडी) श्रीमती प्राजक्ता बुरांडे यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी करता नायब तहसीलदार संजय जांभूळकर यांनी अथक प्रयत्न केले. महसूल कर्मचारी राजेश उपरकर, धर्मपाल मेश्राम, बाळू ठोंबरे, सुनिता कडव, इंदू कुथे, छाया बारेवार, रामटेके, लांजेवार, कुलरकर, बनसोड मंडळ अधिकारी, धावडे, मेश्राम, साटकर, कापसे, नेवारे, टांगले सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी करता परिपूर्ण प्रयत्न केले.

जनतेचा उत्स्फूर्त सहभाग, तात्काळ सेवा, पारदर्शक प्रशासन आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे तुमसर येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हे भंडारा जिल्ह्यातील आदर्श आणि यशस्वी शासकीय उपक्रम म्हणून ठरले, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *