१२ तास कृषी वीजपुरवठा मागणीसाठी करडी वीज कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

वीज वितरण विभागाकडून नकार
१ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- शेतीसाठी दिवसाला १२ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी जांभोरा, पालोरा, कोका, करडी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी करडी येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरण विभागाने १२ तास वीज देण्यास स्पष्ट नकार दिल्याने शेतकरी संताप झाले. भर पावसात कार्यालयाच्या गेटसमोर ठिय्या मांडून ‘आम्hala १२ तास वीज द्या’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी १२ तास कृषी वीजपुरवठ्याची मागणी करत आहेत. मात्र वीज वितरण विभागाने दाद न दिल्याने अखेर जांभोरा-पालोरा मार्गाने पायदळ मोर्चा काढण्यात आला. शेकडो शेतकरी घोषणा देत करडी वीज कार्यालयावर धडकले आणि गेटसमोर ठाण मांडून बसले.

प्रारंभी मोहाडी वीज वितरण विभागाचे अभियंता गिर्हेपुंजे यांनी शेतकऱ्यांची हमजूज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आक्रमक झाल्याने भंडारा येथून कार्यकारी अभियंता डेकाटे तातडीने दाखल झाले. त्यांनी स्पष्ट केले की, ‘१२ तास वीजपुरवठा देण्याबाबत आम्हाला वरून कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे सध्या फक्त ८ तासचं वीजपुरवठा मिळेल.’

अधिकार्यांच्या या उत्तरानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश आणखी वाढला. रात्री-अपरात्री २-२ तास वीज येते. पिकांना पाणी द्यायचे कसे? शेतात झोपावे लागते. जंगली जनावरांची, साप-विंचवाची भीती असते. दिवसाला १२ तास एकगठ्ठा वीज दिल्याशिवाय शेती परवडणार नाही, अशी संताप भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

वाद वाढल्यानंतर मोहाडी चे अभियंता गिर्हेपुंजे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, खडकी येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर, साधारण एक वर्षानंतर शेतीसाठी १२ तास अखंडित वीजपुरवठा देता येईल. तोपर्यंत आहे त्या स्थितीत सहकार्य करावे.

मात्र या तोंडी आश्वासनावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. ‘आश्वासन नको, लेखी आदेश द्या. एक वर्ष आम्ही कसे काढायाचे?’ असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

या आंदोलन प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. प्रिती शेंडगे, उपसरपंच यादोराव मुंगमोड, रमेश गोबाडे, ताराचंद समरीत, संतोष गोबाडे, विलास गोबाडे, बाळकृष्ण गोबाडे, जगदीश गोबाडे, उमेश तुमसरे, रविंद्र तिजारे, नामदेव गोमासे, यशवंत गायधने, गुड्डू हातझाडे, विश्वनाथ गोबाडे, राजधर शेंडे, मुन्ना गोबाडे, सत्यलाल बिसने, लोकेश रोटके यांच्यासह जवळपास पाचशे शेतकरी सहभागी झाले होते.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त, तणावाचे वातावरण
शेतकऱ्यांचा आक्रोश वाढल्याने करडी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभारी ठाणेदार रविंद्र रेवतकर यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भंडारा येथून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीने व समजुतीनंतर वातावरण शांत झाले.

१ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
चर्चेतून कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने अखेर करडी, पालोरा, जांभोरा, कोका परिसरातील शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट २०२६ रोजी करडी टी-पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘मागणी मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,’ असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

वीज वितरण विभागाने १२ तास वीजपुरवठा देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास १ ऑगस्टचा रास्ता रोको तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *