‘पेपरफुटी थांबवा, भविष्य वाचवा’ विद्यार्थ्यांचे मोच्याने भंडारा शहर दणाणले
गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक विद्यार्थ्यांची रॅली
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- देशभरात वारंवार होत असलेल्या स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेतील पेपरफुटी तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या विरोधात भंडारा येथे विद्यार्थी व कॉंक्रोच जनता पार्टी (सीजीपी) च्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘भंडारा बंद’ ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातून निघालेल्या शांततापूर्ण रॅलीने सरकारचे लक्ष वेधले.
गेल्या काही महिन्यांत नीट, टीईटी, पोलीस भरती, रेल्वे भरती यासह अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून पारदर्शक व न्याय्य परीक्षा प्रणालीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सीजीपी व स्थानिक विद्यार्थ्यानी बंदचे आवाहन केले होते. सकाळी ११ वाजता गांधी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. ‘पेपरफुटी बंद करा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा’, ‘शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या’ अशा घोषणा देत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. रॅली मुख्य मागनि त्रिमूर्ती चौकात पोहोचताच पोलिसांनी ती अडविली. त्यानंतर त्रिमूर्ती चौकातच रॅलीचे सभेत रूपांतर करण्यात आले. सभेत विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. ‘आम्ही रात्रदिवस अभ्यास करतो आणि माफिया पेपर विकून आमचे स्वप्न उद्ध्वस्त करतात, सरकार यावर गप्प का?’ असा सवाल विद्यार्थी नेत्यांनी उपस्थित केला. पेपरफुटी हा केवळ गैरप्रकार नसून तो युवकांच्या भविष्याशी खेळणारा संघटित गुन्हा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सभे नंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. हे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली.
बंदमुळे शहरातील काही भागातील दुकाने व आस्थापना सकाळच्या सत्रात बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी जनजीवन सुरळीत सुरू होते. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनाचे आयोजन विद्यार्थी व कॉंक्रोच जनता पार्टी (सीजीपी), भंडारा यांनी केले होते.
विद्यार्थ्यांच्या मागण्या
-
पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांची निष्पक्ष व वेळबद्ध एसआयटी / न्यायालयीन चौकशी करावी.
-
दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी काले यादित टाकावे.
-
परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित व तंत्रज्ञानाधारित करावी.
-
नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.








