भाकप व किसान सभेतर्फे लाठी चार्ज व दडपशाहीच्या विरोधात कलेक्टर कचरी समोर निदर्शने आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा भंडारा तर्फे देशव्यापी आवाहनानुसार दिनांक २२ जुलै २०२६ ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील लाठी चार्ज, सरकारची दडपशाही व देश विरोधी भारत अमेरिका डील च्या विरोधात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते, व भाकप चे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या नेतृत्वात निदर्शनि आंदोलन करून माननीय राष्ट्रपतीच्या नावे मा. जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या काँग्रेच, ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन (ए आय एस एफ)चे विद्यार्थी युवक युवती कार्यकर्ते तसेच इतर सर्व आंदोलनकर्त्यांवर दिल्ली सरकारच्या पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठी हल्ल्याविरुद्ध दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात व शिष्टमंडळात मोठ्या संख्येत महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी होते त्यात प्रामुख्याने कॉम्रेड माधवराव बांते, कॉम्रेड हिवराज उके, कॉम्रेड सदानंद इलमे, अनिल गाढवे, गजानन पाचे, दिलीप ढोरे, माणिकराव कुकडकर, महानंदा गजभिये, डॉ. बाळकृष्ण सार्वे, मनोहर टिचकुले, प्रभाकर वैरागडे, अरुण जगनाडे, सुधाकर मोथलकर, विष्णू जगनाडे, मुकुंदा पाचे, अनिल लुटे, डी एस बिरणवार, वामनराव चांदेवार, गौतम भोयर इत्यादींचे उपस्थिती होती.








