खुर्शीपार बांध तलावाचे कॅनल फुटल्याने ५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
शेताची नुकसान भरपाई देण्याची पिडीत शेतकऱ्याची मागणी परसोडी,सालेभाटा शेतशिवारातील येथील प्रकार
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या परसोडी, सालेभाटा शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात खुर्शीपार बांध येथील जाणारा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या पन्नास हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने नुकताच केलेल्या धान लागवडची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दि. २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सालेभाटाकडे जाणारा कालवा पूर्ण भरला होता. यामध्ये शेता शेजारील कालवा फुटून या कालव्याचे पाणी परसोडी, सालेभाटा शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात शिरल्याने शेताला भगडाड पडल्याने यात शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबतीत शेतकऱ्यांनी तीन वर्षापासून तक्रार करूनही पाटबंधारे विभागाने लक्ष दिल नाही त्यामुळे पहिल्यांदा विश्व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भात लागवड केलेले रोपे, बांधातील धुिरे वाहून गेले तसेच धान नर्सरी पाण्याखाली गेले. चक्क शेतातच भगडाड पडल्यामुळे भविष्यात या जमिनीवर शेती करणे अशक्य झाले आहे. या नुकसानीसाठी पाटबंधारे विभाग जबाबदार असून त्यांनी शेती दुरुस्त करून द्यावी अशी पिडीत शेतकऱ्यांची मागणी आहे.
लाखनी तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत हद्दीत येणारा खुर्शीपार येथील जंगलात तलावाची निर्मिती तयार केले असून तलावाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे या उदात हेतूने १९८३ साली सालेभाटाकडे जाणारे कॅनल तयार करण्यात आले असून सनियंत्रण, देखरेख, दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असलीतरी ४० वर्ष पूर्ण झालेल्या कॅनलचे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी मिळाला नाही असे लाभार्थी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबतीत पिडीत शेतकऱ्याने वारंवार सहाय्यक अभियंता यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने सदर कॅनल पांढरा हत्ती ठरत असल्याने पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांनप्रती उदासीन आहे हे दिसून येते. मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान व कालव्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना गरज पडेल तेव्हा पाणी मिळाले नाहीतर सदर कॅनल शेतकरी आपल्या शेतात मिसळल्याशिवाय राहणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेताची लवकरच नुकसान भरपाई व रब्बी शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी कॅनलची योग्य दुरुस्ती करून दिली नाही तर संबंधित विभागाच्या विरोधात उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा पिडीत शेतकऱ्यांनी दिला आहे.








