मोहाडी पं. स. सभापतीपदी बाणा सव्वालाखे व उपसभापतीपदी आशा बोंद्रे अविरोध

राष्ट्रवादी-भाजप समर्थकांचा जल्लोष

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी: मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदाच्या फेरनिवडणुकीत राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला. सभापतीपदी बाणा सव्वालाखे तर उपसभापतीपदी आशा बोंद्रे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर पंचायत समिती सदस्य बाणा सव्वालाखे यांनी, तर उपसभापतीपदासाठी आशा बोंद्रे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. दुसरीकडे, अविश्वास प्रस्तावानंतर पदावरून पायउतार झालेले सभापती जगदीश शेंडे यांनी सभापतीपदासाठी, तर माजी उपसभापती रेवानंद चकोले यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता.

दुपारी दोन वाजता निवडणूकी प्रक्रियेला सुरुवात झाली. छाननीनंतर जगदीश शेंडे व रेवानंद चकोले यांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. त्यामुळे सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी बाणा सव्वालाखे व आशा बोंद्रे यांची अविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा तुमसरचे उपविभागीय अधिकारी गणेश दिघे यांनी जाहीर केले.

निवडणूक प्रक्रियेस गटविकास अधिकारी सतीश लिलहारे व सहाय्यक गटविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे यांनी सहकार्य केले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. या निवडीमुळे पंचायत समितीतील सत्तासमीकरणानाही नवे राजकीय बळ मिळाल्याची चर्चा रंगली.

सभापती – उपसभापती निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचायत समिती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलेखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत नाराजीचे वातावरण होते. उमेश भोंगडे व आशा बोंद्रे यांच्यात इच्छुकांची चुरस होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी उमेश भोंगडे यांनी उपसभापतीपदाची जोरदार मागणी केल्याची चर्चा होती. मात्र आशा बोंद्रे यांना आधीच शब्द दिल्याने निर्णय बदलणे शक्य नसल्याचे पक्षातील वरिष्ठांकडून स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले जाते.

अर्ज मागे घेताच शेंडे थेट बाहेर
अविश्वास प्रस्तावानंतर पद गमावलेले माजी सभापती जगदीश शेंडे हे पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा यापूर्वीपासून होती. विशेष सभेलाही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. सोमवारी नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्यांतर ते कोणाशीही संवाद न साधता थेट सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी अनेकांच्या नजरेत भरली.

‘एकच वादा:’, ‘एकच भाऊ’ च्या घोषणांनी परिसर दणाणला
निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापती बाणा सव्वालाखे व उपसभापती आशा बोंद्रे यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. हार, दुपट्टे, गुलाल यांची उधळण सुरू असताना दोन गटांकडून वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. एका गटाकडून ‘एकच वादा:’, तर दुसऱ्या गटाकडून ‘एकच भाऊ:’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दोन आजी-माजी आमदारांच्या समर्थकांनी आपापल्या पद्धतीने जल्लोष साजरा केला.

आम्ही घड्याळवाले नाही:
निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हार, दुपट्टे व गुलालाचा वर्षाव सुरू असताना भाजप समर्थक पंचायत समिती सदस्यांनी त्यापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यांना हार घालू द्या, त्यांना गुलाल उधळू द्या; आम्ही त्यात सहभागी होणार नाही. आम्ही घड्याळवाले नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे भाजप सदस्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत छायाचित्र काढणेही टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *