पिसाळलेल्या कोल्ह्याचा शेतशिवारात धुमाकूळ, दोन दिवसांत तिघांवर हल्ला

रोवणी हंगामात शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी: तालुक्यातील करडी, पालोरा व मुढरी परिसरातील शेतशिवारात एका पिसाळलेल्या कोल्ह्याने अक्षरश: धुमाकूळ घालत दोन दिवसांत तीन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. रोवणी हंगामामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी व मजुरांची वर्दळ असताना या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

पहिली घटना १४ जुलै रोजी पालोरा येथे घडली. रूपाली सुदत्त तिरपुडे या रस्त्याने जात असताना पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक त्यांच्यावर झडप घालत चावा घेतला.

दुसऱ्या दिवशी, १५ जुलै रोजी मुढरी खुर्द येथील शामकला कचरू सोनवणे या शेतातील धुऱ्यावर जात असताना त्यांना कोल्हा दिसला. त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करताच कोल्ह्याने उलट त्यांच्यावर हल्ला करून उजव्या पायाच्या मांडीला चावा घेतला. याच दिवशी करडी येथील सुब्रता वासुदेव मेश्राम या शेतात गेल्या असताना कोल्ह्याने त्यांच्या अंगावर धाव घेत उजव्या भुजेला व कमरेला चावा घेत त्यांना जखमी केले.

तिन्ही जखमींना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, करडी येथे दाखल करण्यात आले. डॉ. गायत्री मोहनकर व परिचारिका स्वाती सिंगनजुडे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडले.

सध्या रोवणी हंगाम सुरू असल्याने शेतामध्ये महिलांसह शेतकरी आणि मजुरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. अशा परिस्थितीत पिसाळलेल्या कोल्ह्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने वन विभागाने संबंधित कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षितेची हमी द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *