भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

आ. भोंडेकर यांच्या नेतृत्वात पवनी विद्युत वितरण कंपनीला घेराव

दैनिक लोकजन वृत्तसेवा
पवनी: तालुक्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होत असलेल्या भारनियमनाच्या विरुद्ध आज आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे घेराव करण्यात आले. पवनी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर करण्यात आलेले हे आंदोलन सुमारे दीड तास चालले, ज्यात आ. भोंडेकर यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोन द्वारे चर्चा करून पवनी शहर व ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य जनतेचा प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे व स्मार्ट मीटरच्या संबंधित असलेल्या लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश दिले.

उल्लेखनीय आहे की, मागील दोन दिवसांपासून गावठाण फिडवर रात्री ७.३० ते ११.३० या वेळेत अचानक भारनियमन (लोडशेडिंग) सुरू करण्यात आले. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. सदर बाब माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा मोखारा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत भुते आणि युवासेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोसे ग्रामपंचायतीचे सरपंच आशिषकुमार माटे यांनी आमदार मा. नरेंद्रभाऊ भोंडेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर आमदार भोंडेकर यांनी तातडीने विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता निमजे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याचे कठोर निर्देश दिले होते. तसेच, लोडशेडिंग पूर्णतः बंद न केल्यास दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या कार्यालयासमोर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत आज आ. भोंडेकर यांनी पवनी विद्युत वितरण कार्यालय पोहचून अधिकाऱ्यांचा घेराव केला. सुमारे दीड तास चाललेल्या या घेराव आंदोलना दरम्यान त्यांनी मुंबईच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *