लिखित आश्वासनानंतर तुमसर नगर परिषदेसमोरील आमरण उपोषण स्थगित

सफाई कामगारांच्या मागण्यांना यश

दैनिक लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांच्या संपामुळे आणि गेल्या चार दिवसांपासून नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण नगर परिषद प्रशासनाने कामगारांच्या प्रमुख मागण्यांबाबत लिखित आश्वासन दिल्याने सोमवारी स्थगित करण्यात आले.

स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन चिघळत असतानाच, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यांनी आंदोलक आणि तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्यात संयुक्त बैठक घडवून आणली. या बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात (क्र. तून/आवि/३३६/२०२६, दि. १३/०७/२०२६) स्पष्ट केले आहे की, निवेदनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असलेला EPFO-ESIC आणि ग्रॅज्युईटी, तसेच शासनाच्या प्रचलित अधिनियमानुसार किमान वेतन कायदा, विमा या सर्व बाबी आगामी घनकचरा व्यवस्थापनाच्या नवीन कंत्राटामध्ये बंधनकारक करण्यात येतील. तसेच, सध्या कार्यरत असलेल्या स्थानिक कंत्राटी कामगारांना नवीन कंत्राटात प्राधान्याने समाविष्ट करून घेण्याबाबत संबंधित कंत्राटदारास प्रशासनातर्फे विशेष शिफारस करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिली.

उपोषण सोडवण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष शैलेश पडोळे, दिलीप लांजेवार, जाकीर तुरक, विक्रम लांजेवार, विवेक भोंडेकर, तिलक गजभिये, शिव बोरकर, दीपक लोटे, पवन खवास, गजानन लांजेवार, डॉ. शांताराम चाफले, रवी बाबरे, तरुण लांजेवार, कुमार रगडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी सफाई कामगार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *