राखीव वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई
वन्यजीव विभागाने केला ट्रॅक्टर जप्त
दैनिक लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या केसलवाडा गावालगट वनपरिक्षेत्र कोका वन्यजीव अंतर्गत बिट पालोरा (बफर) क्षेत्रात अवैध रित्या अतिक्रमण करणाऱ्यांवर वन्यजीव विभागाने मौका पंचनामा करून कारवाई केली आहे. नांगरणी केल्याप्रकरणी अतिक्रमण करणाऱ्यावर व ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजा केसलवाडा येथील कक्ष क्रमांक ८३ पीएफ या राखीव वनजमिनीवर अतिक्रमण करून नांगरणी केल्याप्रकरणी उमेश गोपीचंद मेश्राम व ट्रॅक्टर चालक अमोल गंगाधर मेश्राम, दोन्ही रा. केसलवाडा यांच्याविरुद्ध वन्यजीव विभागाने गुन्हा नोंदवून कडक कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान एमएच-३६-एजी-७१५७ क्रमांकाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कोडापे साहेब, सहाय्यक वनसंरक्षक कांबळे साहेब व वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली बिट रक्षक पालोरा (बफर) ए. एन. बनसोड यांनी ही कारवाई केली.
कोका वन्यजीव अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून ‘बफर’ क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण, शेती किंवा बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरीही काही जण वनजमिनीवर अवैध रित्या कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गस्त वाढवून ही कारवाई करण्यात आली.
‘वन्यजीव अधिवास क्षेत्रात अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी वनकायद्याचे पालन करावे,’ असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांनी दिला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे बफर क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, वनविभागाच्या या तत्पर कारवाईचे परिसरात स्वागत होत आहे. पुढील तपास बिट रक्षक बनसोड करत आहेत.








