धोक्यात असणाऱ्या पत्रकारितेचा धर्म वाचवा – संदीप काळे
भंडाऱ्यात विदर्भातील पत्रकारांच्या उपस्थितीत ‘पत्रकार हक्क परिषद’
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकारांतून विदर्भात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना
‘भंडारा व्हॉईस ऑफ मीडिया’ पुस्तकाचे विमोचन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- ‘संपूर्ण जगाच्या लोकशाहीचा आणि समाजव्यवस्थेचा आधार पत्रकारितेवर आहे. समाजाला दिशा देणारी, सत्तेला जाब विचारणारी आणि जनतेचा आवाज बनणारी पत्रकारिता आज अनेक अडचणींच्या विळख्यात सापडली आहे. राजकीय दबाव, सामाजिक आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीमुळे पत्रकारिता आपला मूळ धर्म गमावण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे धोक्यात आलेला पत्रकारितेचा धर्म वाचवण्यासाठी सर्व पत्रकार, संपादक, माध्यम संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकारितेशी संबंधित प्रत्येकाने एकत्र येऊन संघर्ष उभारला पाहिजे. ही केवळ पत्रकारांची लढाई नसून लोकशाहीच्या अस्तित्वाची लढाई आहे,’ असे भावनिक आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय ‘पत्रकार हक्क परिषद’ व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेला विदर्भातील एक हजारावून अधिक पत्रकार पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, माध्यमासमोरील सध्याची आव्हाने, बदलत्या माध्यमविश्वातील जबाबदाऱ्या आणि संघटित पत्रकार शक्तीची आवश्यकता यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, विदर्भ विभागाध्यक्ष व्यंकटेश दुदमवार, भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकंत भोयर, जिल्हा अध्यक्ष नागपूर दिलीप घोरमारे, गडचिरोली जिल्हा प्रवक्ते नसिर हाशमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संदीप काळे पुढे म्हणाले, ‘आम्ही येथे केवळ समस्या मांडण्यासाठी जमलो नाही, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी आलो आहोत. संघटित पत्रकार हीच सर्वात मोठी ताकद आहे. आपण एकजुटीने उभे राहिलो तर कोणतीही शक्ती पत्रकारितेचा आवाज दाबू शकणार नाही. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमने पत्रकारांचे घर, आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास आणि सामाजिक सुरक्षेसाठी सातत्याने काम केले आहे. मात्र हा प्रवास एका संस्थे नसून प्रत्येक पत्रकाराचा आहे’.








