सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरलेला सहयोग पतसंस्थेचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- ‘विश्वास, पारदर्शकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी’ या चार सूत्रांवर यशस्वी वाटचाल करत नागपूर विभाग मान्यता प्राप्त सहयोग सहकारी पतसंस्था मर्या., तुमसर यांनी आपला ३७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा केला. संस्थेच्या मुख्यालयातील स्व. लक्ष्मणराव मानकर सभागृहात आयोजित या सोहळ्याने सहकार क्षेत्रातील इतर पतसंस्थांसमोर आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मो. तारिकजी कुरेशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी माजी खासदार मधुकरराव कुकडे, सहायक निबंधक सहकारी संस्था प्रमोद हुमने, व्यापारी संघाचे सचिव दिनेशजी अग्रवाल, उपाध्यक्ष कैलास पडोळे, प्राचार्य राहुल डोंगरे, इंजि. प्रमोद शाहू, ॲड. आशिष कुकडे, महेश देशमुख, मुन्ना वाडीभस्मे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लाभली.
वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या ३७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. संस्थापक अध्यक्ष मो. तारिकजी कुरेशी यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा संघर्ष, सभासदांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचे योगदान आणि संचालक मंडळाच्या एकजुटीमुळे संस्था सातत्याने प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून सभासदांना अधिक दर्जेदार व पारदर्शक सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी प्रमोद हुमने यांनी सहकार क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि सभासदकेंद्री कार्यपद्धती स्वीकारल्यास त्यांचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो, असे सांगत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. माजी खासदार मधुकरराव कुकडे यांनी सहयोग पतसंस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत, ‘ही संस्था केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून समाजविश्वास जपणारी आदर्श सहकारी चळवळ आहे,’ असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कर्जवसुली करणाऱ्या मुख्यालय व विविध शाखांतील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून संस्थेने गुणवत्ता, जबाबदारी आणि कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचे अधोरेखित झाले.
कार्यक्रम मास संस्थेचे संचालक दामोदर सोनवणे, डॉ. अनुप कोर्डे, विजय अनवाणी, चंद्रकुमार फुलवधवा, राशिद शेख, सौ. मालती आगाशे, सौ. लक्ष्मी ईळपाचे, सौ. किरण अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक विनोद धांडे, उपमुख्य व्यवस्थापक मो. सोहेल कुरेशी तसेच अधिकारी, कर्मचारी आणि विविध शाखांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर पवार, प्रमोद ठाकरे, अजय पालवे, महेंद्र कोंडेवार, अमित इलमे, नितीन चावके, भूमेश्वर कोसरे, वीणा बारेवार, अविनाश मोटघरे, मोहसीन तुरक, भास्कर ढबाले, माणिक मांडवटकर, प्रकाश कोवे, योगेश मस्के, अश्विनी समर्थ, धनश्री येरने, नसरीन शेख, निगहत तुरक, मोरेश्वर मस्के, सुरेश खैरसार, राजेंद्र बोरघरे, श्रीकृष्ण गभणे यांच्यासह संस्थेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सहयोग सहकारी पतसंस्थेचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा हा केवळ उत्सव न राहता, शिस्तबद्ध व्यवस्थापन, सभासदांप्रती निष्ठा, उत्कृष्ट आर्थिक नियोजन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा आदर्श नमुना ठरला. सहकार क्षेत्रातील इतर पतसंस्थांसाठीही हा सोहळा प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन डॉ. युवराज जमईवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभाकर सिंगनजुडे यांनी मानले.








