बस-ट्रेलरच्या भीषण अपघातात चालकासह ७ जण गंभीर जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- साकोलीतील लखादूर रोडवरील माकोडे पेट्रोल पंपासमोरील वळणावर दुपारी बस आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह ७ जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे लखादूर रोड काही काळासाठी बंद झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाने सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारांसाठी प्रत्येकी १,००० रुपयांची तात्काळ आर्थिक मदत दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजता साकोली बसस्थानकावरून एमएच ०७ सी ९५४३ क्रमांकाची बस नवेगाव बांधाच्याकडे निघाली होती. दुपारी ३:४५ वाजता पेट्रोल पंपासमोरील वळणावर लखादूरहून साकोलीकडे येणाऱ्या सीजी ०४ एनझेड २८०७ क्रमांकाच्या ट्रेलरने बसला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत बस चालक श्यामराव धनपटे, ५६ वर्षे आणि वाहक राकेश दादेमल, ४० वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले. याशिवाय बसतील ५ प्रवासीही जखमी झाले. त्यात जयमाला लांडगे, ५० वर्षे, रा. सावळ महागाव, जयश्री केद्रे, ३३ वर्षे, रा. सनगडी, नेहा गोटेफोडे, १९ वर्षे, रा. सासरा, गुंजन डुंभारे, १९ वर्षे, रा. सासरा आणि सत्यभामा रंगारी, ६५ वर्षे, रा. सनगडी यांचा समावेश आहे. अपघातांतर सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर चालक श्यामराव धनपटे, वाहक राकेश दादेमल आणि जयमाला लांडगे, जयश्री केद्रे, नेहा गोटेफोडे, सत्यभामा रंगारी या ६ जणांना अधिक उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातांतर ट्रेलर रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने साकोली-लखादूर मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला. यामुळे वडसा, मोरगाव अर्जुनी आणि चांदपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. शाळेला सुट्टी झाल्यानंतर साकोलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही वेळ थांबावे लागले. क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

साकोली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *