खांबावर काम करताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- तालुक्यातील टांगा येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्वप्निल रामकृष्ण शेंडे (वय २८, रा. टांगा) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल शेंडे हा कंत्राटी पद्धतीने विजेचे खांब उभारणे व विद्युत तारा टाकण्याचे काम करणारा अनुभवी कामगार होता. शेजारील घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तो खांबावरील केबलवर साचलेला कार्बन साफ करण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास खांबावर चढला. काम सुरू करण्यापूर्वी त्याने डीपीवरील वीजप्रवाह बंद केल्याची माहिती आहे. कार्बन साफ करून केबल जोडण्याचे काम सुरू असतानाच अज्ञात व्यक्तीने डीपीवरून पुन्हा वीजप्रवाह सुरू केला. त्यामुळे स्वप्निलला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्याचा खांबावरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरच्यांनी आक्रोश केला असून, स्वप्निलच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास आंधळगाव पोलीस करीत आहेत. तसेच वीजप्रवाह कोणी आणि कोणत्या कारणांमुळे सुरू केला, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *