इस्रोच्या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी मोहाडीच्या हिमांशूची निवड

१३ जुलैला घेणार विमानाने बंगळूरकडे झेप
नामवंत शास्त्रज्ञांशी साधणार संवाद

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- जिद्द, गुणवत्ता आणि विज्ञानावरील प्रचंड ओढ यांच्या बळावर स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय, मोहाडी येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी हिमांशू दिलीप भजने याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बंगळूरू येथील शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी निवड झाली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या माध्यमातून निवड झालेल्या हिमांशूला १३ जुलै रोजी नागपूरहून विमानाने बंगळूरूला जाण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या या यशामुळे मोहाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या क्षेत्रभेटीदरम्यान हिमांशूला इस्रोमधील नामांकित शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच चंद्रयान, गगनयान यांसारख्या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांबाबत सविस्तर माहिती, उपग्रह निर्मिती केंद्र, प्रक्षेपण यंत्रणा आणि अत्याधुनिक अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची दुर्मिळ संधी त्याला लाभणार आहे.

हिमांशूने विविध विज्ञान प्रयोगांमध्ये सातत्याने सहभाग नोंदविला आहे. विद्यालयातील विज्ञान शिक्षक शरद मालोदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्याच्या वैज्ञानिक जिज्ञासेची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने आपल्या मेहनत, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर इस्रोपर्यंत झेप घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून हिमांशूचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञान क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *