पुराच्या विळख्यातून मातृत्वाला दिला सुरक्षित आधार:भजेपार येथील आरोग्य पथकाची वेळेली शर्यत

गरोदर मातेचे धाडसाने स्थलांतर, कर्तव्यनिष्ठेचा आदर्श

दैनिक लोकजन वृत्तसेवा
गोंदिया: निसर्गाच्या रौद्र रूपापुढे अनेकदा मानवी जीवन हतबल होते; मात्र संकटाच्या क्षणी कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि संवेदनशिलतेची साथ लाभली तर आशेचा किरण अधिक तेजस्वी ठरतो. सालेकसा तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत सोमवार ६ जुलै रोजी भजेपार येथील एका गरोदर मातेचे आरोग्य धोक्यात आले असताना आरोग्य विभागाच्या पथकाने वेळेली शर्यत करत सुरक्षित स्थळी हलवून मातृत्वाला सुरक्षित आधार दिला. या धाडसी कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.

सततच्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर भजेपारच्या कार्यक्षेत्रातील एका गरोदर महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोलहार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने विलंब न लावता मदतकार्य सुरू केले.

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश कतरे, आरोग्य सेविका कु. विद्या बाहेकर आणि आशा स्वयंसेविका श्रीमती विनूताई खंडवाये यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता पूरग्रस्त भागात प्रवेश केला. पाण्याने वेढलेल्या परिसरातून अत्यंत संयमाने आणि दक्षतेने गरोदर मातेला बाहेर काढत पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी स्थानांतरित करण्यात आले. संकटाच्या क्षणी दाखविलेली त्यांची तत्परता आणि निर्णयक्षमता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.

याबाबत डॉ. दिनेश कतरे म्हणाले, ‘पुरामुळे संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली होती. मात्र माता आणि बाळाचे प्राण सुरक्षित ठेवणे हेच आमचे सर्वोच्च कर्तव्य होते. योग्य वेळी मदत पोहोचविण्यात आम्हाला यश आले, याचे समाधान आहे.’

‘सर्वांसाठी आरोग्य सेवा’ आणि ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेचा प्रत्यय या घटनेतून आला. दुर्गम आणि पूरग्रस्त भागातही आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रशासनाचा निर्धार या कृतीतून दिसून आला.

वेळेली घेतलेला अचूक निर्णय अनेकदा जीव वाचवतो, याची ही घटना जिवंत साक्ष ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, समन्वय आणि सेवाभाव यांची सांगड घालत आरोग्य पथकाने संकटावर मात केली. गरोदर मातेच्या कुटुंबीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून, सालेकसा तालुक्यात या कर्तव्यदक्ष पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुराच्या प्रखर लाटांमध्येही मानुसकीचा हात कधीच मागे हटत नाही, याचा प्रत्यय या घटनेने पुन्हा एकदा दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *