आ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने उमरेड-पवनी-करांडला अभयारण्य परिसरातील बाधित गावांच्या पुनर्वसनाला गती
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा: राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक यांच्या विधानभवनातील दालनात भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील उमरेड-पवनी-करांडला अभयारण्य परिसरातील अधिसूचित व बाधित गावांचे पुनर्वसन, योग्य मोबदला आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीसाठी आमदार परिणय फुके यांनी विशेष पुढाकार घेत बाधित गावांच्या पुनर्वसनाचा विषय वनमंत्र्यांसमोर प्रभावीपणे मांडला.
पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, बाधित ग्रामस्थांना योग्य व न्याय्य मोबदला द्यावा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न लवकर लवकर निकाली काढावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी बाधित ग्रामस्थांच्या मोबदल्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच पुढील सहा महिन्यांच्या आत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आमदार परिणय फुके यांना दिले.
बैठकीत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक, वेगवान आणि न्याय्य पद्धतीने पूर्ण करून बाधित ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले.
आ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उमरेड-करांडला अभयारण्य परिसरातील बाधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा संबंधित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.








