उमरेड येथील अटुल मोटारसायकल चोरट्यास अटक
लाखनी पोलिसांची मोठी कारवाई, १० मोटारसायकल हस्तगत
बनावट आरसी तयार करून गाड्या विक्रीचा धक्कादायक प्रकार
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी:- लाखनी पोलिसांनी अटुल मोटार सायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १० मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये आहे. आरोपी बनावट आरसी तयार करून मोटार सायकल विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विक्री वसंता रामटेके, वय ३० वर्षे, रा. मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०२:०० वा. सुमारास प्रकाश रुपचंद कांबळे, वय २५ वर्षे, रा. पोहरा हे त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस सायकल क्र. एमएच ४० एस ८२८५ हे पोहरा येथील शंकरपट पाहण्यासाठी गेले असता त्यांची मोटारसायकल चोरीला गेली. पोलीस स्टेशन लाखनी येथील सदर गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार सुरेश आत्राम हे करीत होते.
पोलीस स्टेशन लाखनी येथे नव्याने रूजू झालेले ठाणेदार आशिष गजभिये यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे मार्गदर्शन केले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे विक्की वसंता रामटेके, याने मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पकडण्यासाठी गेलेले पथक उमरेड येथे पोहोचण्यापूर्वीच त्याला पोलिसांचा संशय आल्याने त्याने दि. ०१/०७/२०२६ रोजी चोरी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. एमएच ४० एस ८२८५ लाखनी येथील मोसीन बिर्याणी जवळ आणून ठेवली. त्यानंतर दि. ०२/०७/२०२६ रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गाडी मोसीन बिर्याणी जवळ ठेवल्याचे सांगितले. त्याठिकाणी जाऊन मोटार सायकलसह बनावट आरसी स्मार्ट कार्डही जप्त करण्यात आली.
सदरची कार्यवाही नूरूल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, सहाय्यक फौजदार सुरेश आत्राम, पो.हवा. वच्छला चाचरें, अमितीश वंडेटवार, निलेश रामटेके, पो.शि. ओमप्रकाश सार्वे, भुपेश हटवार, प्रशांत धकाते, लक्ष्मीकांत झलक यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष गजभिये हे करीत आहेत.
एकूण १० गाड्या हस्तगत
आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने लाखनी, पालांदूर, साकोली, मौदा, उमरेड, नागपूर व रामटेक परिसरातून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून खालील १० मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या त्यामध्ये मोटार सायकल क्रमांक असे आहेत एमएच ३६ डब्लू ५८२५, एमएच ३६ एस २२६८, एमएच ४० टी २२४५, एमएच ३१ डीएम ०६२७, एमएच ४० एई ९०६४, एमएच ४१ एयू ९३०५, एमएच ४१ क्यू ८३९५, एमएच ४१ एक्यू १८०९, एमएच ३६ बी ४६३५, एमएच ४० एस ८२८५ असे एकूण १० मोटारसायकल हस्तगत करण्यात आले. तपासात आरोपी बनावट आरसी तयार करून मोटार सायकल विक्री करीत असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.








