शिष्यवृत्ती पोर्टलवर बनावट विद्यार्थी दाखवून २९ लाख ६० हजाराची फसवणूक

मोहाडी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची तब्बल २९ लाख ६० हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मोहाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक संतोष बापूजी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते नागपूर विभागातील ६ जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठांना अनुदान वितरण व सेवा विषयक बाबी पाहतात. सन २०२१-२०२२ व २०२२-२०२३ मधील नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वरील नोंदणीकृत संस्थांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश त्यांना मिळाले होते.

त्यानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चामोर्शी, जि. गडचिरोली व स्व. तुळशीरामजी तितरमारे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी, जि. भंडारा या संस्थेची प्रशासन अधिकारी शंकर बर्गे व वरिष्ठ लिपीक जितेंद्र परतेकी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. शासनाकडून प्राप्त यादीतील २२७ विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण संस्थेच्या लॉग इन मधून शिष्यवृत्तीच्या वेबसाइटवर संस्थेचा युडायस् कोड वापरून फॉर्म भरून शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्याचे दिसून आले.

मात्र प्रत्यक्षात सदर २२७ विद्यार्थी संस्थेत २०२१-२०२२ व २०२२-२०२३ मध्ये प्रवेशीतच नव्हते. तपासणीत असे निदर्शनास आले की, आरोपींनी स्व. तुळशीरामजी तितरमारे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या युडायस् कोडचा गैरवापर केला.

संस्थेचे मूळ हेड ऑफ इन्स्टिट्यूट कुणाल भोंगाडे यांच्या ऐवजी शांतुराव हंबर्डे यांना बनावट एचओआय म्हणून दाखवण्यात आले. तसेच मूळ इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर भूषण तितरमारे यांच्या ऐवजी झरीना खातून यांना बनावट आयएनडी म्हणून दाखवण्यात आले. या दोघांनी बनावट पदे धारण करून २२७ विद्यार्थ्यांचे बनावट शिष्यवृत्ती फॉर्म भरले व शासनाकडून त्यांच्या नावे २९ लाख ६० लाख १०० रुपये प्राप्त करून शासनाची फसवणूक केली.

या गंभीर प्रकारानंतर सहसंचालक संतोष चव्हाण यांच्या लेखी तक्रारीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बेलखेडे हे करीत आहेत.

शिष्यवृत्तीच्या नावाखाली शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *