गोंदियात एनएसयूआयचे आंदोलन; शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी कठोर कारवाईची मागणी
नीट, टीईटी पेपरफुटीच्या सावटाविरुद्ध विद्यार्थ्यांचा एल्गार
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया: स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेवरील विश्वासाला तडा देणाऱ्या कथित नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा निषेधार्थ गोंदिया शहरात शनिवारी एनएसयूआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात एकत्र येत शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनागोंदीविरोधात आवाज बुलंद केला. घोषणांनी दुमदुमलेल्या चौकात हातात फलक घेत कार्यकर्त्यांनी पेपरफुटी घटनांबाबत केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे अथक परिश्रम, आर्थिक खर्च आणि मानसिक तणाव सहन करून परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ होणे ही गंभीर बाब असल्याचे मत आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारवर टीका करत, गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना वारंवार समोर येत असल्याने शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेतील विश्वास अबाधित राखण्यासाठी पंतप्रधानांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आंदोलनात माजी आमदार दिलीप बनसोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजकुमार (पप्पूभाऊ) पटले, विशाल अग्रवाल, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अमन मेनन, माजी जिल्हा सचिव गौरव बिसेन यांच्यासह काँग्रेस व एनएसयूआयचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्पर्धा परीक्षांमधील प्रामाणिकपणा हा केवळ प्रशासकीय विषय नसून देशाच्या भावी पिढीच्या स्वप्नांशी जोडलेला विश्वासाचा धागा आहे. तोच धागा वारंवार तुटत असल्याची खंत या आंदोलनातून व्यक्त झाली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारलेला हा आवाज केवळ एका पेपरफुटी विरोधातील निषेध नसून, अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि उत्तरदायी शिक्षण व्यवस्थेची मागणी करणारा लोकशाहीचा ठाम स्वर ठरला.








