शासकीय आरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाचा हक्क

आ. भोंडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री आबिटकर यांचे निर्देश

दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयात पाठवणे, कट प्रॅक्टिसला प्रोत्साहन देणे खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकाराने गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

जिल्ह्यातील विस्कळीत आरोग्यसेवेबाबत आमदार भोंडेकर यांच्याकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. १०८ व १०२ रुग्णवाहिका शासकीयऐवजी खासगी रुग्णालयात रुग्णांना सोडत असल्याने गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासह आशा वर्करच्या कामाचा आढावा, उपजिल्हा रुग्णालयातील आधुनिक संसाधने, औषधांचा तुटवडा याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावर मंत्री आबिटकर म्हणाले, ‘काही ठिकाणी रुग्णांना जाणीवपूर्वक विशिष्ट खासगी रुग्णालयात पाठवले जात आहे. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी, ॲएमएस समन्वयक व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.’

त्यांनी मागील सहा महिन्यांचा रेफरल डेटा तपासण्याची सूचना देत अनियमितता आढळल्यास कारवाईचे आदेश दिले. गरजू रुग्णांना तातडीने शासकीय किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयात पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तुमसर, साकोली व पवनी उपजिल्हा रुग्णालयांची क्षमता १०० वरून २०० करण्याची मागणी आमदार भोंडेकर यांनी केली. त्यावर मंत्री आबिटकर यांनी संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यावर भर देत आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे सांगितले. सर्व शासकीय संस्थांमध्ये दर्जेदार औषधे, स्वच्छता व मनुष्यबळ उपलब्ध राहावे, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले. निधी व सुविधा देऊनही दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. दर तीन महिन्यांनी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठकीला सिव्हिल सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला आमदार महेंद्रशेट दळवी, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये प्रत्यक्ष हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *