जनांवरांना अवैध वाहतूक करणाऱ्यावर करडी पोलिसांची कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- जनावरांना दाटीवाटीने कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूर पद्धतीने अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ७ जनावरे व महिंद्रा बोलेरो पिकअपसह एकूण ६ लाख ०५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन करडी अंतर्गत गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी दिलीप सेवक बांते, (वय ३५, रा. खैरी ता. तिरोडा जि. गोंदिया) हा महिंद्रा बोलेरो पिकअप डाला गाडी क्र. एम. एच. ३५ ए. जे. ४७१६ मधून ७ जनावरांची वाहतूक करत होता. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, यातना व वेदना होतील अशा रीतीने डाळ्याच्या आडव्या लोखंडी पट्टीला नायलनाच्या दोरीने बांधून, विना पास-परवाना त्यांची वाहतूक सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळीच आरोपीला ताब्यात घेऊन ७ जनावरे व महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी असा एकूण ६ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचसमक्ष जप्त केला.
आरोपीविरुद्ध करडी पोलीस स्टेशन येथे अप.क्र. १९६/२०२६ कलम ११(१)(ड) प्राण्यांना क्रूरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा सहकलम ९ प्रा.सं.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सपोनि नागलोत यांच्या मार्गदर्शनात पो.शि. बोरकर, पोहवा. वरकडे, पो.स्टे. करडी यांनी केली असून पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.








