तीन महिन्यांचा पाठलाग; अखेर ‘टी-२७’ वाघिन जेरबंद
चार हले, दोन बळी अन् दहशत
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- साकोली तालुक्यासह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या व वन विभागासाठी एक आव्हान ठरलेली ‘टी-२७’ या लंगड्या वाघिणीला अखेर रविवारी उमरजरी परिसरातील आमगाव बुज. जंगलातून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
ही जखमी नरभक्षक वाघीण गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आमगाव, आतेगाव, उमरजरी, पिटेझरी, खांबा, जांभळी, वडेगाव, बिरसी आणि सातलवाडा यांसह आसपासच्या वनक्षेत्रात सक्रिय होती. या काळात तिने चार ते पाच जणांना जखमी केले आणि या काळात एक पुरुष व एक महिला यांना ठार मारले. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे या परिसरात सायंकाळ होताच एकट्याने कोणीही नागरिक फिरत नव्हते तसेच सध्या शेतीचे हंगाम सुरू झाल्याने शेतकरी समूहाने आपापल्या शेतात जात होते.
रविवारी सकाळी उमरजरी परिसरातील उसाच्या शेतात एका शेळीची शिकार केल्यानंतर वाघीण त्या परिसरात असल्याचे माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर तातडीने राबविण्यात आलेल्या कारवाईत तिला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. पशूवैद्यकीय अधिकारी मेघराज तुलावी यांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार वाघिणीस रेस्क्यू करण्यात आले. सदर कारवाहित नागपूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे उपवनसंरक्षक श्रीमती पियुषा जगताप, उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांचे मार्गदर्शनात तिला जेरबंद करण्यात आले.
१९ दिवसांत तीन हल्ले
मार्च महिन्यात या वाघिणीने अवघ्या १९ दिवसांत तीन हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंत मेश्राम यांचा मोहफुले वेचताना या वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर २७ मार्च रोजी उमरजरी येथील माया सोनवणे यांच्यावर डबा घेऊन बसलेल्या या वाघिणीने हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या माया सोनवणे यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमगाव येथील छाया मुंगमोडे या महिलेदेखील वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, २४ जून रोजी आमगाव येथील हरिश्चंद्र मडावी यांच्यावर पुन्हा हल्ला करून वाघिणीने त्यांचा बळी घेतला.
नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत
शेतकरी, मजूर आणि वनक्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडतानाही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरे, कॅमेरे, ट्रॅप यंत्रणा आणि विशेष पथके तैनात केली होती. मात्र जखमी अवस्थेतील ही वाघीण अत्यंत सावधपणे हालचाली करत असल्याने ती पकडण्यास विलंब होत होता. नवेगाव-नागझिरा व्याघ्र आणि भंडारा येथील वनविभागाचे एफडीसीएम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.








