भंडारा जिल्ह्यात जूनमध्ये विजांच्या तडाख्याने ४ जणांचा मृत्यू; २१ पशूंचाही समावेश
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जून २०२६ या महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वीज पडून घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भंडारा जिल्ह्यात मोठी जीवित व पशुहानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ४ नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला असून २६ लहान पशू दगावले आहेत. तसेच ३ मोठी जनावरे व १ व्यक्ती जखमी झाली आहे. ३ मोठी जनावरे व २२ लहान जनावरे दगावली आहेत. पवनी व मोहाडी तालुक्यात प्रत्येकी १ नागरिकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. भंडारा तालुक्यात मनुष्यहानी झाली नसली तरी ४ लहान जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात मात्र या कालावधीत कोणतीही जीवित किंवा पशुहानी नोंदवली गेली नाही. सुदैवाने या काळात घरांचे, गोठ्यांचे किंवा शेतीपिकांचे नुकसान झाल्याची नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांची संख्याही शून्य आहे.
प्रशासनाच्या ‘प्रोग्रेसिव्ह’ अहवालानुसार सर्वाधिक फटका तुमसर तालुक्याला बसला आहे. तुमसरमध्ये वीज पडून २ जणांचा मृत्यू झाला असून १ व्यक्ती जखमी आहे. याशिवाय दि. १३ जून रोजी तुमसर तालुक्यातील लोहारा येथील सुरेश गणपत भागडकर यांचे दोन बैल वीज पडून मृत्युमुखी पडले तर दि. २२ जून रोजी लोहारा येथीलच भीमाबाई भोजराम उचिबगले (वय ५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. त्याच दिवशी देवनारा येथे सौ. गोराबाई धनराज कोसरे यांच्या २ शेळ्या, भारत भिका पेंदाम यांच्या १४, ताराचंद श्रावण सलाम यांच्या ३, कन्हैया सुदाम मरसकोल्हे यांच्या २ व देवीचंद सिताराम मेश्राम यांची एक अशा एकूण २२ शेळ्या मृत पावल्या तसेच सुकळी देव्हाडी येथील रुपेश मारुजी चौधरी यांची एक म्हैस मृत पावली.
दि. २३ जून २०२६ रोजी भंडारा तालुक्यातील करचखेडा येथील सुमगा अजाबराव मेश्राम यांच्या गोठ्यावर वीज पडल्याने ४ वासरे मृत झाली. दि. २६ जून रोजी २०२६ रोजी पवनी तालुक्यातील ब्रम्हणी येथील श्रीकांत दिगांबर बारस्कर (वय ३९) व ढोलसर येथील शरद दवदु बुद्धे (वय ४५) यांचा वीज पडून मृत्यू झाला तर भंडारा तालुक्यातील मंडणगाव येथील महेश पांडुरंग फेंडर (वय ३५) हे वीज पडून जखमी झाले.
दि. २९ जून रोजी दुपारी ३:३० वाजता मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे शेतात काम करत असताना रामकृष्ण तुळकू देशमुख (वय ५२) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
“नागरिकांनी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याच्या काळात झाडाखाली, मोकळ्या शेतात किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये. विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. मनुष्यहानी व पशुहानीबाबत मदत वाटपाचे प्रस्तावित असल्यास तात्काळ संबंधित तहसील कार्यालयात संपर्क साधावा. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठीही जिल्ह्यात मेघगर्जनसह पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.”
— अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी








