तुमसरमध्ये गांजा सेवन करताना नागपूरचे दोन तरुण ताब्यात
१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- रेल्वे लाईन परिसरात उघड्यावर गांजाचे सेवन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील दोन तरुणांवर तुमसर पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे लाईनजवळील सार्वजनिक ठिकाणी दोन इसम अमली पदार्थ गांजाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता दोघे चिलीममध्ये गांजा ओढताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची अंशुल नरेंद्र घरडे, (वय २१, रा. गुमगाव रोड, हिंगणा ता. हिंगणा जि. नागपूर) व कार्तिक राजू वळमे, (वय २०, रा. तुळमी ता. डोंगरगाव जि. नागपूर) अशी आहेत. दोन्ही आरोपींकडून दोन मोबाईल, सुझुकी ॲक्सेस मोपेड क्र. एमएच ४० डीबी ८८४३ व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४० हजार १२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस हवालदार पंकज बाहेकर, पो.शि. अमोल आदमने व डी.बी. पथकाने केली. पुढील तपास पोउपनि प्रविण सयाम करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.शि. गिरीपुंजे, बाबने, बळदे व झंझाड यांनी सहभाग घेतला.








